पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात रविवापर्यंत ४,८७८ बाधित आढळले. तर उपचार घेणऱ्या रुग्णांची संख्या १,४३१ वर पोहोचली असली तरी पालिका प्रशासनाने तीन हजार खाटांचे विविध १४ ठिकाणी नियोजन केले आहे. त्यामुळे उपचार मिळणार नाहीत, अशी भीती नागरिकांनी बाळगू नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
याच वेळी करोना दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतराचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. यात नागरिकांनी अकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर गेल्यास मुखपट्टी लावण्याचे तसेच सामाजिक अंतर पाळण्याचे स्पष्ट केले.
एमजीएम रुग्णालयात कृत्रिम श्वसनयंत्रणा आणि प्राणवायू पुरविणारी सुविधा असलेल्या खाटांची सोय आहे. विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला एमजीएम रुग्णालयात विविध रुग्णालयातील संबंधित रुग्णाची फिरवाफिरवी के ल्यानंतर संबंधित रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर त्यास एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आल्याने येथील उपचारादरम्यान मृतांची संख्या अधिक दिसत असल्याचा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.
सध्या पालिका प्रशासनाने रुग्णांसाठी क्षेत्रात प्राणवायूचा पुरवठा यंत्रणा असलेल्या खाटांची संख्या ३०, अतिदक्षता विभागातील संख्या ६५, प्राणवायू खाटांची संख्या ४२८ , सर्वसाधारण खाटांची संख्या २२९३ असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
त्यापैकी कोन येथील इंडिया बुल्स येथील करोना काळजी केंद्रात २००० सर्वसाधारण खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. यात कामोठेतील एमजीएम रुग्णालय आणि पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा कृत्रिम श्वसनयंत्रणा असलेल्या खाटांची सोय आहे. तसेच अतिदक्षता विभागातील खाटांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दहा, तर एमजीएम रुग्णालय २० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. प्राणवायूची सोय असलेल्या खाटांसाठी पालिकेने केलेल्या नियोजनात उपजिल्हा रुग्णालयात ९२ तर एमजीएम रुग्णालयात १५० खाटांची सोय करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत तीन नवीन रुग्णालयांशी करार करण्यात आला आहे. यात पनवेल येथील पॅनेसिया रुग्णालय, कामोठे येथील क्रिटिकल रुग्णालय आणि नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात तब्बल १५० खाटांची सोय करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयात १२५ खाटा या प्राणवायू यंत्रणेसह ठेवण्यात आल्या आहेत. अतिदक्षता विभागात २५ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.
२ कोटी २६ लाख खर्च
पनवेल पालिका सध्या एमजीएम रुग्णालयाला महिन्याला एक कोटी २८ लाख तर डी. वाय. पाटील रुग्णालयाला ९८ लाख रुपये रुग्णदेखभाल आणि इतर सुविधा पुरविण्याचा खर्च देत आहे.
