नवी मुंबई : ऐरोली येथील एनएचपी (होराईझन पब्लिक स्कुल) शाळेविरोधात पालकांनी आंदोलन केले. शाळेने नियमबाह्य शुल्क वाढ केली असून, अनेक बाबतीत शाळेचा अरेरावीपणा सुरू असल्याने पालकांकडून रास्ता रोको करण्यात आला.
करोना काळात शासनाने आदेश देऊनही शुल्क वसुली केली. ज्यांनी वेळेवर शुल्क भरले नाही त्यांना रोज १०० रुपये दंड करणे, या कारणांनी हे आंदोलन करण्यात आले. शाळेच्यासमोर आंदोलनास बसलेल्या पालकांशी शाळा व्यवस्थापन चर्चा करण्यास तयार नसल्याने पालकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावर्षी शाळेच्या माध्यमातून १५ टक्के नियमबाह्य शुल्क वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर करोना काळात सरकारने शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना देऊनही शाळेने एकही रुपया कमी केला नाही. केंद्र सरकारच्या पाठ्यक्रमाची पुस्तके न वापरता खाजगी पाठ्यक्रम शिकवून पालकांना ८ हजार रुपयांची महागडी पुस्तके खरेदी करण्यास शाळा भाग पाडत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
हेही वाचा – बेलापूर: खाऊगल्लीची हातपाय पसरी सुरु; नियमांना फाटा, पालिकेची कारवाई कधी?
हेही वाचा – नवी मुंबई : ‘येथे’ चोरीच्या पाण्यावर बहरतात रोपवाटिका; मनपाच्या भरारी पथकाचे दुर्लक्ष
याबाबत पालक आशिष सैदाणे यांनी सांगितले की, शाळा प्रशासन बोलण्यासही तयार नाही, या शिवाय पाल्यांना शुल्काबाबत मानसिक त्रास दिला जातो. हे बंद होणे आवश्यक आहे. तर पालक कांचन वर्मा यांनी सांगितले की, अभ्यासक्रम नियमातील असावा. शाळेत अव्वाच्या सव्वा किमती लावून शैक्षणिक साहित्य विक्री बंद करावी किंवा बाजार भावनुसार तरी विक्री करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी आंदोलन केले.
दरम्यान याबाबतीत शाळा व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.