अत्याधुनिक व स्मार्ट सुविधा देणाऱ्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने महिनाभरापासून एनएमएमटी प्रवाशांना रोकडरहित व्यवहारासाठी ‘ओपन लूप’ कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र या सेवेकडे प्रवाशांनी पाठ दाखवली आहे. फक्त ३० कार्ड विकले गेले आहेत.
नवी मुंबई परिवहन उपक्रमाने प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित बससेवेबरोबर प्रत्येक बस थांब्यावर बसची वेळ समजावी, घरबसल्या तिकीट नोंदणी करता यावी यासाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. प्रवासात तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने वाहन व प्रवाशी यांच्यात नेहमीच वाद होत असतात. हे वाद टाळण्यासाठी रोकडरहित व्यवहारावर भर देत ‘एनएमएमटी’ प्रशासनाने मार्च २०१९ मध्ये ‘ओपन लूप’ कार्डचे उद्घाटन केले होते. मात्र त्यानंतर करोना आणि टाळेबंदी सुरू झाल्याने ही प्रणाली कार्यान्वित झाली नव्हती. हळूहळू एनएमएमटी सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर डिसेंबरपासून या नवीन स्मार्ट कार्डची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या वातानुकूलित बसमध्ये सीबीडी बस टर्मिनसमधून १०० रु. शुल्क आकारून प्रवाशांना हे कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्डचा वापर प्रवाशांना बस तिकीट व पाससाठी करता येणार आहे. तसेच ते ‘एटीएम कम डेबिट कार्ड’ स्वरूपाचे असल्याने सर्व प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारासाठी देयक कर भरणा, सिनेमा तिकीट, वाहतूक बस, रेल्वे व विमान सेवा, मोबाइल रिचार्ज, डी.टी.एच. सेवांची देयके भरण्यासाठी करता येणार आहे.
यात आपल्या वैयक्तिक रकमेच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमीही देण्यात आली आहे. या कार्डद्वारे व्यवहार झाल्यास लगेच संदेश मिळत आहे. मात्र प्रवाशांनी महिनाभरात या कार्डला अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. परिवहन विभागाने एकूण २० हजार कार्ड वाटपाचे ध्येय ठेवले असले तरी महिनाभरात केवळ ३० कार्ड विकले गेले आहेत.
मार्चमध्ये ‘ओपन लूप’ स्मार्ट कार्डचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र टाळेबंदी आणि करोनामुळे नियोजन रखडले होते. डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. याला अद्याप प्रतिसाद मिळत नाही. याबाबत अधिक जनजागृती करण्यात येईल आणि याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
– शरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएनटी