दान करणाऱ्यांसाठी मदतकक्ष

नवी मुंबई : शहरात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या १२००च्या घरात गेल्याने अत्यवस्थ रुग्णांसाठी रक्तद्रव मिळत नसल्याने गैरसोय होत होती. महापालिका प्रशासनाने यासाठी मदत केंद्र निर्माण केले असून रक्तद्रव बँक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका अधिकाऱ्याचीही नेमणूक केली आहे.

शहरात सुविधा नसल्याने रक्तद्रवसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना दात्यांच्या शोधात फिरावे लागत होते, त्यांची व्यथा ‘लोकसत्ता’ने मांडली होती.

एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारची प्रतिजैविके तयार करतं. करोना विषाणूतून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीच्या शरीरात करोनाशी लढण्यासाठीची प्रतिजैविके तयार झालेली असतात. त्यामुळे करोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णाचे रक्तद्रव अत्यवस्थ रुग्णाला दिले जाते.

सध्या नवी मुंबईत दैनंदिन रुग्णांची संख्या १२०० पर्यंत गेली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा अधिक झाली आहे. त्यात अनेक रुग्णांची प्रकृती खालावल्यावर कृत्रिम प्राणवायू देण्यात येतो. त्याचबरोबर रक्तद्रव हा घटक त्याच्या शरीरात सोडण्यात येतो. नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत करोनावर उपचार करण्यात येत आहेत, मात्र काही रुग्णांना रक्तद्रवची गरज निर्माण होत आहे. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांपाशी ऐनवेळी मागणी होत आहे. मात्र शहरात मुळात रक्ताचाच पुरवठा कमी आहे. त्यात प्रशासनाने करोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्यासाठी तशी कोणतीही सुविधा सद्य:स्थितीत उपलब्ध नाही. गेल्या वर्षी अपोलो रुग्णालयात ही व्यवस्था होती. मात्र ती रुग्ण कमी करण्यात आल्याने बंद करण्यात आली होती. त्यामुळे रक्तद्रवच्या शोधात रुग्णांचे नातेवाईक फिरत आहेत. त्यात ‘ओ’ रक्तगटाचा रक्तद्रव हवा असेल तर मोठी पंचाईत होत आहे. त्यामुळे रक्तद्रव बँक तयार करण्याची मागणी होत होती.

यावर महापालिका प्रशासनाने रक्तद्रव बँक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी  डॉ. प्रीती संगानी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रक्तद्रव दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना पालिकेच्या (०२२-२७५६७४६०) या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा. करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी २८  दिवसांनंतर स्वत:हून पुढे येत रक्तद्रव दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.