नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-१ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारकाचे काम पूर्ण होऊनही केवळ राजकीय श्रेयाच्या वादामुळे लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त मिळत नसल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे स्मारक खुले करण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता, मात्र तोही मुहूर्त उलटला. आता दिवाळीपूर्वी उद्घाटन न झाल्यास, पाडव्याच्या (२२ ऑक्टोबर) दिवशी शिवभक्त स्वतःच स्मारकाचे लोकार्पण करतील, असा इशारा शिवप्रेमींकडून देण्यात आला आहे.
शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ असलेल्या या चौकात महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसवण्यात आली आहे, परंतु गेल्या चार-पाच महिन्यांपासून ही मूर्ती झाकून ठेवण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक हा सोहळा पुढे ढकलला जात असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे. १० सप्टेंबर रोजी पालिकेला दिलेल्या पत्रात त्यांनी ६ ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्याची मागणी केली होती, तर २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रात दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पालिकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र संताप आहे.
… तर गुन्हे दाखल झाले तरीही पर्वा नाही!
सकल मराठा समाजाने पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर दिवाळीपूर्वी स्मारकाचे उद्घाटन झाले नाही, तर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समस्त शिवभक्तांच्या उपस्थितीत हे लोकार्पण केले जाईल. यावेळी ढोल-ताशा आणि महिला लेझीम पथकांचा सहभाग असेल. प्रशासनाने यात अडथळा आणल्यास किंवा आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. महाराजांना या अवस्थेत जास्त काळ ठेवणे आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. असा निर्वाणीचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी विविध राजकीय पक्ष पुढे सरसावताना दिसत आहेत. यापूर्वी नवी मुंबई काँग्रेसकडून महापालिका आयुक्तांना पुतळ्याच्या लोकार्पणसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार येत्या लक्ष्मी पुजनापर्यंत या पुतळ्याचे लोकार्पण करा अशी मागणी करण्यात आली आहे. तर नुकतेच मनसे शहरप्रमुख गजानन काळे यांनी दिवाळी आधी पुतळ्याचे लोकार्पण करावे अशी मागणी केली आहे. या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांची भावना एकच असली तरी महाराजांचा पुतळा सध्या राजकीय कुरघोडीचे केंद्र बनला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येत्या काळात राजकीय श्रेयवादाचे राजकारणही रंगण्याची शक्यता सर्वसामान्यांकडून वर्तवली जात आहे.
पालिका प्रशासनाची भूमिकेबाबत संभ्रम
याबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मात्र संभ्रम वाढवणारी आहे. कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी अभियंता विभागाचे काम पूर्ण झाले असून, आता पुतळ्याच्या लोकार्पणाचे काम प्रशासकीय विभागाचे असल्याचे सांगितले आहे. तर महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे काम शहर अभियंत्यांचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकमेकांवर जबाबदारी ढकलणारे प्रशासन आणि राजकीय अनास्था यामुळेच स्मारकाचे लोकार्पण रखडल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे.