सुईपासून संगणकापर्यंतच्या लाखो वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या कागदाचा लगदा (बोर्ड) बनविण्याऱ्या यंत्रांचे उत्पादन गेली २० वर्षे रबाले औद्योगिक पट्टय़ात होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वितरित होणारी ही यंत्रे मागणीनुसार बनविली जात असून हाताच्या बोटावर ही यंत्रे बनविणाऱ्याकंपन्यांच्या यादीत जसमिरा इंजिनीअरिंगचे नाव मोठय़ा विश्वासार्हतेने घेतले जात आहे.  काही तांत्रिक कामगारांच्या बळावर हे नाव निर्माण झाल्याचा अभिमान कंपनीच्या मालकाला आहे. त्यामुळे या कारखान्यात कोणीही व्यवस्थापक, पर्यवेक्षक, अभियंता, फोरमॅन नाही. हे विशेष. कामगारांनी मालकासाठी चालविलेला कारखाना असाच उल्लेख जसमिराचा करता येईल.

कोडपुल्ली रामकृष्णन गोपी अर्थात के. आर. गोपी असे या कारखान्याच्या मालकाचे नाव. तीन साडेतीन वर्षे राजकारणात मुशाफिरी करून त्यांनी राजकारणाला जय महाराष्ट्र केला. केवळ बारावीपर्यंत शिक्षण असलेला हा दाक्षिणात्य तगडा गडी आता कागद उद्योगविश्वातील एक बाप माणूस ओळखला जातो. काय आहे त्यांचा उद्योग. जीवनावश्यक अनेक वस्तूंची बांधणी विविध प्रकारच्या जाड कागदात केली जाते. त्याला आपण पुठ्ठय़ाचे वेष्टनही असेही म्हणतो. त्यासाठी देशात खूप मोठय़ा प्रमाणात कागद उत्पादन करणारे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारी विविध प्रकारची यंत्रे जसमिरा बनवून देते. टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याचा हा उद्योग देशाच्या अनेक भागात केला जातो. त्यासाठी विविध प्रकारची रद्दी गोळा केली जाते. या रद्दीत असणाऱ्या स्टॅपल पिना, गम, प्लॅस्टिक वेगळा करण्यासाठी आधुनिक यंत्रे वापरली जातात. त्यानंतर त्या रद्दीचा लगदा तयार करून त्यापासून जाड कागद किंवा पुठ्ठा तयार केला जातो. हा जाड कागद तयार करण्यासाठी लागणारी यंत्रेही जसमिरा तयार करून देते. त्यात शून्य एमएमचाही फरक होणार नाही याची काळजी घेतली जाते. उदाहरणार्थ, साडेतीन मीटरच्या तयार करण्यात आलेल्या कागदात एखादा एमएम फरक आला तर हे यंत्र तो कागद बाहेर फेकून देते. रबाले एमआयडीसीतील दोन कारखान्यात या विविध प्रकारच्या चार यंत्रांचे उत्पादन केले जाते. देशाबरोबच अलीकडे पाकिस्तान, इजिप्त, देशात ही यंत्रे निर्यात करण्यात आल्याचे गोपी अभिमानाने सांगतात. यासाठी लागणारे आराखडे फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि इंग्लंड येथून आयात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे परदेशातील यंत्र आणि देशी जसमिराची यंत्र यात यत्कचिंतही फरक जाणवत नाही.

मुंबईतील खटाव मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करणारे गोपी यांचे वडील रामकृष्णन यांनी १९७२ मध्ये पै पैसा करून घाटकोपरमधील जसमिरा कंपनीत मोठय़ा मुलाच्या नावावर गुंतवणूक केली. आर्थिक स्थिती तशी बेताचीच. तीन भाऊ. त्यामुळे जेमतेम शिक्षण झाल्यावर पोटाच्या खळगीसाठी नोकरीधंदा शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचवेळी गोपी यांनी बारावी पास केल्याने दुबईत जाणे पसंत केले. तेथे गेलेल्या गोपीने रशिद या शासकीय रुग्णालयात शिपायाची कायमस्वरूपी नोकरी पत्करली. पडेल ते काम करणे या स्वभावामुळे गोपी यांनी लवकरच लिपिक पदाची पदोन्नती मिळाली. १३ वर्षांनंतर एक दिवस परत मुंबई गाठली.  गोपी यांनी मोठय़ा भावाची भागीदारीत असलेल्या जसमिराची सूत्रे हाती घेतली. तिचे नाव कागदनिर्मिती क्षेत्रात गाजत आहे.