शाहाबाज

मुघल साम्राज्याची आठवण मनात कायम कोरून ठेवणारे गाव म्हणजे बेलापूर रेल्वे स्थानकाजवळचे शाहाबाज गाव. सर्व जातीधर्माची लोकवस्ती असलेल्या या गावात आतापर्यंत जातीय किंवा धर्मीय दंगा झाल्याची नोंद नाही. इतकी गुण्यागोंविदांने येथील ग्रामस्थ गेली दोनशे वर्षे राहात आहेत. चारही बाजूने भातशेती असलेल्या या गावाची लोकसंख्या आता दीड हजाराच्या घरात गेली आहे. जेमतेम अठरा कुटुंबाचे हे गाव शेतीप्रधान म्हणून ओळखले जात होते. मोजकीच मंडळी मासेमारी किंवा मीठागरांवर कामाला जात होती. सिडकोने हीच भातशेती संपादित केल्याने या गावातील ग्रामस्थांच्या पदरी साडेबारा टक्के योजनेतील सर्वाधिक भूखंड पडले. त्यामुळे अगोदर तोलामोलाची आर्थिक स्थिती असलेल्या या गावाची नंतरच्या काळात चांगलीच प्रगती झाल्याचे दिसून येते.

मुघलांचा एक सरदार शाहाबाज खान याची छावणी या भागात काही काळ असल्याने नंतर त्याच्या नावानेच या गावाची ओळख पडली. ब्रिटिश काळात जमिनींची मोजमाप पद्धत सुरू झाल्यानंतर मौजे शाहाबाज हे गाव आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा जुने मानले जाते. गावाचे नाव जरी शाहाबाज असले तरी या गावात पाटील, भोईर, कोळी, भंडारी या अठारापगड जातींची लोकवस्ती आजही गुण्यागोविंदाने नांदत आहे.

गावात माता मराआई आणि जय हनुमानची मंदिरे जशी आहेत तशी मस्जिद आणि दर्गादेखील आहे. संपूर्ण नवी मुंबईत बोनकोडे आणि शाहाबाज या दोन गावात दर्गे आहेत. गावातील सत्तर टक्के रहिवाशी चांगल्या प्रकारची भातशेती करीत असल्याने भाताचे गाव म्हणूनही या गावाची एक वेगळी ओळख आहे. गावातील अनेक तरुण त्या वेळी कबड्डी, खो-खो खेळात राज्य व जिल्हा पातळीवर नेतृत्व करणारे होते. आज त्या खेळांची जागा क्रिकेटने घेतली आहे. बेलापूरमध्ये विद्या प्रसारकचे हायस्कूल झाल्याने या गावालाही शिक्षणाचा परीसस्पर्श झाला आणि गावातील तरुण शिक्षणाकडे ओढले गेले. त्यामुळे जवळच्या सिडको अथवा पालिकेत या गावातील अनेक तरुणांनी नंतर नोकऱ्या पत्करल्या. त्याच वेळी समुद्र तस्करीमध्ये या गावातील तरुणांचा सहभाग लक्षवेधी होता. संपूर्ण बेलापूर पट्टीतील दुकानांना पाव व बिस्कीट पुरवठा करणारी पहिली बेकरी या गावात होती. त्यामुळे विद्या प्रसारकमधील अनेक विद्यार्थी या बेकरीतील पदार्थाचा स्वाद घेण्यासाठी आवर्जून जात होते. लोकसंख्येने तसे साठ ते सत्तर लोकवस्तीचे ह्य़ा गावातील अनेक रहिवाशी हे त्यांची मूळ गावे सोडून राहण्यास आलेले असल्याचा दाखला आहे. समुद्रातील वाघिवली बेटावर असलेले काही कोळी बांधव किंवा फणसपाडा दिवाळ्यातील तरुणांनी त्या वेळी शाहाबाजला आपले मानले आणि तेथेच बस्तान बसविले. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचे संक्रमण गाव म्हणूनच शाहाबाजकडे पाहिले जात होते. राजकीय पातळीवर सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान बाबू बाब्या भोईर यांना जात आहे. त्याच वेळी झानेश्वर भोईर यांनी आदर्श शिक्षक म्हणून गावाचे नाव देशपातळीवर नेल्याचे ग्रामस्थ आजही अभिमानाने सांगतात. त्यांनी विद्या प्रसारक शाळेचे काही काळ मुख्याध्यापक म्हणूनही काम केले.

विशेष म्हणजे या गावात एकही तलाव नाही. त्याऐवजी काही विहिरीवर पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जात होती. बाजारहाटासाठी बेलापूर ही हक्काची बाजारपेठ होती, पण त्यापूर्वी तुर्भे येथील बाजारपेठेलाच महत्त्व दिले जात होते. वाहतुकीची साधने म्हणजे बेलापूरहून सकाळ-संध्याकाळ सुटणारी एसटी हेच हक्काचे साधन होते, पण इतर गावांप्रमाणे चारही बाजूने पाणी नसल्याने ग्रामस्थ बैलगाडीचाही सर्रास वापर करीत होते. आज जाती-धर्मात छोटय़ा छोटय़ा कारणांनी तेढ निर्माण होत असताना शाहाबाजमध्ये हिंदू-मुस्लीम लोकसंख्या पन्नास पन्नास टक्के  असूनही गावात कधी जातीय दंगे झालेले नाहीत.

उलट मुस्लीम समाजाच्या ऊरुससाठी हिंदू बांधवांची उपस्थिती आणि ग्रामस्थांच्या जत्रेला मुस्लिमांची हजेरी हे हिंदू-मुस्लीम एकोप्याचे जातिवंत उदाहारण आहे. काही ठिकाणी तर रोटी-बेटीलाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे आगरी कोळी समाजात मुस्लिमांचाही तेवढाच सहभाग असल्याने बोली-चाली तसेच खाद्यपदार्थात या दोन समाजांतील फरक कोणालाही सांगता येणारा नाही.

पारसिक डोंगराचे एक टोक या गावाच्या उत्तर दिशेला लागून आहे तर बेलापूर रेल्वे स्थानकाला खेटून या गावाचा विस्तार झाला आहे. जमिनीचा मुबलक पैसा हाती आल्याने काही ग्रामस्थांनी त्याचा योग्य तो वापर केला तर काही जणांनी त्याची माती केली. अलीकडे सुश्राव्य भजनाच्या माध्यमातून मुंबई ते मॉरिशस असे शाहाबाजचे नाव जगाच्या पाठीवर नेणारे महादेवबुवा शाहाबाजकर कुटुंबाने शाहाबाज नावाची पताका फडकावीत ठेवली आहे. ती कायम ठेवण्यासाठी तरुण पिढीने पुढे येण्याची गरज ग्रामस्थांना बोलून दाखवितात.