त्रुटी दाखवत घडय़ाळे वापराविना पडून
पूनम सकपाळ, लोकसत्ता
नवी मुंबई : पालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली ‘स्मार्ट वॉच’ ही योजना वर्षभरातच बंद पडली आहे. सध्या जुन्याच पद्धतीने म्हणजे बायोमेट्रिक हजेरी घेतली जात आहे. साडेअकरा कोटी रुपये खर्च करीत घेतलेली घडय़ाळे सध्या पडून आहेत.
ही योजना पहिल्या टप्प्यात सफाई कामगार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरू केली होती. त्यानंतर ती सर्वच पालिका अधिकारी, कर्मचारी यांना लागू करण्यात येणार होती. मात्र पहिल्या टप्प्यातच ती बारगळली आहे.
जिओ फेन्सिंग व ट्रेकिंग प्रणालीअंतर्गत ही ‘मनगटी घडय़ाळ’ असलेली योजना तत्कालीन आयुक्त रामस्वामी एन. यांनी आणली होती. या घडय़ाळात जीपीएस सिस्टम असल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती मुख्यालयात बसून उपलब्ध होत होती. याकरिता ११ कोटी ५१ लाख १ हजार रुपये खर्च करण्यात आले होते, तर ३२०० सफाई कामगारांना आणि घनकचरा विभागात ही मनगटी घडय़ाळे वितरित करण्यात आली होती. या ‘स्मार्ट वॉच’मुळे प्रत्यक्षात कामावर हजर असलेल्यांनाच त्याप्रमाणे मानधन दिले जात होते, मात्र ही योजना पुन्हा बारगळली आहे. सध्या बायोमेट्रिक पद्धतीने कामकाज सुरू आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजाळे यांनी ही यंत्रणा सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे.
याबाबत पालिका आयुक्तांनाही ही योजना सुरू आहे की नाही याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. याची माहिती घेऊन योजना बंद असल्यास ती सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कमतरता दाखवून गैरफायदा
गावठाण भागात या घडय़ाळ्यांना रेंज मिळत नाही, ही कारणे देऊन याचा वापर बंद करून जुनी हजेरी पद्धती सुरू आहे. याबाबत सदर स्मार्ट वॉच यंत्रणा व्यवस्थापनचे अधिकारी यांना या यंत्रणेबाबत अधिकृत माहिती देण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे सागितले. यंत्रणा सुरू असून याची अधिक माहिती घनकचरा विभाग अधिकारीच देतील, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेने स्मार्ट वॉच आणि बायोमेट्रिक पद्धतीने संयुक्तरीत्या ही योजना राबविली तरच त्यामध्ये पारदर्शकता येणार आहे. सध्या या घडय़ाळामध्ये काही उणिवा दाखवून ही योजना बंद असून जुन्या पद्धतीने पगारांचे दयेक काढले जात आहे.
– मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता कामगार संघ