एकूण १ हजार ३३ मृत्यू; ऐरोलीत सर्वाधिक १६३
नवी मुंबई</strong> : करोनाबाधितांची संख्या घटली असून करोनामुक्तीचा दरही वाढला आहे; मात्र शहरात करोना मृत्यूचे सत्र कायम आहे. दररोज दोन ते चार जणांचा मृत्यू होत असल्याने मृत्यूंचा आकडा एक हजार पार झाला असून आतापर्यंत १ हजार ३१ करोना मृत्यू झाले आहेत. यात ऐरोलीत सर्वाधिक १६३ मृत्यू आहेत.
दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेला करोना प्रादुर्भाव दिवाळीनंतर पुन्हा वाढला होता. मात्र परत ही परिस्थिती नियंत्रणात येत आहे. यामुळे शहरातील १३ करोना काळजी केंद्रांपैंकी अकरा केंद्रे सद्य:स्थितीत बंद करण्यात आली असून वाशी महापालिका रुग्णालयही सामान्य रुग्णालय करण्यात आले आहे. आता शहरात दोनच ठिकाणी करोनावर उपचार केंद्रित करण्यात आले आहेत. ही परिस्थिती नवी मुंबईसाठी दिलासादायक असली तरी करोनामुळे मृत्यूंचे सत्र थांबलेले नाही. सुरुवातीचे काही दिवस वगळता एकही दिवस करोना मृत्यू झाला नाही असे नाही.
शहरात करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च रोजी सापडला तर पहिला मृत्यू २३ मार्च रोजी झाला. जुलै महिन्यात शहरातील मृत्युदर हा ३.२६ होता. त्यात घट होत नोव्हेंबरमध्ये तो २.०३ टक्केपर्यंत खाली आला होता. त्यानंतर बाधितांच्या संख्येत काहीशी वाढ होत मृत्युदरात किंचितशी वाढ झाली आहे. १८ डिसेंबपर्यंत शहरात करोना मृत्युदर २.०५ टक्के इतका आहे. यात मोठी वाढ दिसत नाही. मात्र करोना मृत्यू थांबविण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही. दररोज करोनामुळे दोन ते चार इतके करोना मृत्यू होत आहेत. त्यामुळे शहरातील करोना मृत्यूंची संख्या ही एक हजारपेक्षा अधिक झाली आहे. यात ऐरोली विभागात सर्वाधिक म्हणजे १६३ करोना मृत्यू झाले असून दिघा विभागात सर्वात कमी ४४ करोना मृत्यू आहेत.
करोना मृत्यू सद्य:स्थिती
* ऐरोली : १६३
* कोपरखैरणे : १५५
* नेरुळ : १५१
* बेलापूर : १५३
* तुर्भे : १४५
* घणसोली : ११३
* वाशी : १०९
* दिघा : ४४
* एकूण करोना मृत्यू : १०३३
शहरातील मृत्युदर टक्केवारी
* ९ जूनपर्यंत : ३.१३
* ९ जुलै : ३.२६
* ३ ऑगस्ट : २.६४
* ३ सप्टेंबर : २.२५
* ३ ऑक्टोबर : २.०५
* ३ नोव्हेंबर : २.०३
* २० डिसेंबर: २.०५