नवी मुंबई : एपीएमसीतील मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारतीचा रखडलेला पुनर्विकास प्रस्ताव अखेर मार्गी लागला असून, या इमारतीच्या पुनर्बांधणीला कार्यालयधारकांनी एकमुखी संमती दिली आहे. महापालिकेने सदर इमारत ‘अतिधोकादायक’ ठरवत तिचा वीज आणि पाणीपुरवठा १८ जूनपासून खंडित केला होता. त्यानंतर लगेचच १९ जून रोजी वाशीतील पाम बीच मॉलमध्ये झालेल्या व्यापारी व कार्यालयधारकांच्या बैठकीत बहुसंख्यांनी पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
या बैठकीत २७२ कार्यालयधारकांपैकी १८० हून अधिक गाळाधारक उपस्थित होते. बैठकीस संचालक विजय भुत्ता, मोहन गुरनानी, अशोक जैन, दीपक शाह, अमरीशलाल बारोट यांच्यासह अनेक प्रमुख व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. बहुमताच्या आधारावर इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
डबघाईला आलेली इमारत, सुरक्षित पुनर्बांधणीचा निर्णय
मसाला मार्केटमधील ही इमारत गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून, डागडुजीच्या असंख्य मागण्यांनंतरही तोडगा निघत नव्हता. महापालिकेच्या ताज्या अहवालानंतर आणि मूलभूत सेवा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांपुढे पर्याय उरला नव्हता. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरक्षित, सुविधायुक्त व आधुनिक पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगचे अध्यक्ष उत्तम भणगे यांनी दिली.
नव्या इमारतीत काय असणार?
प्रत्येक गाळाधारकाला १०० चौरस फूट अधिक जागा
सर्वांना स्वतंत्र वाहनतळाची सुविधा
‘अर्बन अनॅलिसिस’ ही संस्था प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त
पुढील टप्प्यात संचालक मंडळाची अंतिम मंजुरी
पुनर्विकास प्रस्ताव लवकरच संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत सादर केला जाणार असून, तेथे अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती उपसचिव महेश साळुंखे-पाटील यांनी दिली.
“ही इमारत वर्षांनुवर्षे दुर्लक्षित होती. आता सुरक्षित आणि आधुनिक पुनर्बांधणीसाठी सर्व कार्यालयधारकांनी एकत्र येत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.” उत्तम भणगे, अध्यक्ष, सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग