नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव मंगळवारी (१३ मे) सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होत असून, लोकार्पणापूर्वीच या सुविधेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शनिवारी सुरू झालेल्या प्रवेश अर्ज प्रक्रियेत पहिल्याच दिवशी ३०० अर्ज दाखल झाले. तर, रविवारीही १५० हून अधिक नागरिकांनी अर्ज सादर केल्याने आतापर्यंत एकूण ४५० हून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या तलावाचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाले होते. तथापि, विविध प्रशासकीय कारणांमुळे लोकार्पण रखडले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महानगरपालिकेने आजपासून जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकार्पणाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये (१३ व १४ मे) प्रशिक्षित जलतरणपटूंना वापरासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. तर १५ मेपासून नव्याने प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश खुला करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जलतरण प्रशिक्षणाकरिता माफक शुल्क आकारण्यात आले असून, ५ ते १० वयोगटातील मुलांसाठी केवळ १०० रुपयांचे प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

सुमारे १७ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाने उभारलेल्या सेंट्रल पार्कमध्ये एकूण ३९ हजार १३५ चौरस मीटर क्षेत्रावर जलतरण तलावासह स्केटिंग रिंक, मिनी फुटबॉल टर्फ आदी क्रीडा सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित या पार्कमध्ये भविष्यात क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा मानस असून, क्रीडा विभागामार्फत विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमही राबविण्यात येणार आहेत.

सुरक्षेसाठी उपाययोजना

सद्यस्थितीत परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपस्थिती असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत काहीशा शंका उपस्थित होत असल्या तरी, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे यांनी लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सध्या या जलतरण तलावात ४ लाईफ गार्ड आणि २ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही म्हात्रे यांनी सांगितले आहे.

पालिकेचा उद्देश केवळ पोहण्याच्या सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नाही. या जलतरण तलावाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण, सुविधा आणि देखरेख सुनिश्चित केली जाणार आहे.– अभिलाषा म्हात्रे, उपायुक्त, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग, नवी मुंबई महापालिका

चुकीच्या पद्धतीने जलतरण तलावाचे बांधकाम केल्याने नागरिकांच्या कररूपी निधीतील ६२ लाख रुपये वाया गेले आहेत. तरीही अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.- अभिजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते, घणसोली