करोनाकाळात सुरक्षित अंतराचे नियम पालन करण्याच्या उद्देशाने गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावांत विसर्जन करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. मात्र, त्याच वेळी तयार केलेल्या १३५ कृत्रिम तलावांपैकी सीवूड्समधील काही तलावांत पावसाचे पाणी साचू न देता त्यात टँकरने पाणी भरले जात असल्याचा उजेडात आला आहे. टँकर कंत्राटदार आर्थिक गणित जुळविण्यासाठी हा सारा खटाटोप करीत असल्याचा आरोप काही सामाजिक संस्थांनी केला आहे.
नवी मुंबईपालिका क्षेत्रात एकूण २३ पारंपरिक विसर्जनस्थळे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर १३५ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या कृत्रिम तलावात गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी होत आहे. परंतु, पावसाचे पाणी मैदानात सोडून कृत्रिम तलावात टँकरद्वारे जलभरणा केला जात आहे. यावर काही पर्यावरण वादी कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कृत्रिम तलावांत साधारणपणे १२ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या हे पाणी नैसर्गिकरित्या भरत आहे. मात्र, ते कंत्राटदारांमार्फत सोडून दिले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. पाणी नैसर्गिकरीत्या भरले जात असताना पालिकेने नेमलेले कंत्राटदार टँकरच्या पाण्याचा अट्टहास का करीत आहेत, असा सवाल सेव नवी मुंबई एन्व्हॉयरोंमेटच्या सुनील अग्रवाल यांनी केला आहे. कृत्रिम तलावांमध्ये पावसाचे पाणी साठत असेल तर मग टँकरने पाणी आणण्याचा प्रयत्न का केला जात आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्याला ही गोष्ट ठाऊक असायला हवी, की जे पाणी पालिकेला फुकटात मिळत आहे. ते आणण्यासाठी प्रशासन डिझेलवर पैसा खर्च करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया या वेळी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पावसाचे पाणी काढून त्यात टँंकरचे पाणी टाकले जात असेल तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील.
-सुजाता ढोले, पालिका अतिरिक्त आयुक्त