चार महिन्यांत पती-पत्नीच्या वादाच्या ३३९ तक्रारी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : करोनामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले असताना शुल्लक कारणांवरून कुटुंबातील तंटे वाढू लागले आहेत. नवी मुंबईत चार महिन्यांत पती-पत्नीच्या वादाच्या ३३९ तक्रारी पोलिसांच्या महिला कक्षाकडे आल्या आहेत. यात सर्वाधिक वाद दोघांमधील अहमपणामुळे पोलिसांपर्यंत येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीही ७६३ तक्रारी आल्या होत्या.

शांतता व सुव्यवस्थेबरोबर पोलिसांना कौटुंबिक वादही मिटवावे लागतात. यासाठी खास महिला कक्षाची स्थापना करण्यात आलेली असते. मात्र अलीकडे महिलांबरोबर पुरुषांच्याही तक्रारींत वाढ होत आहे. त्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व टाळेबंदी यामळे या तक्रारींत वाढ होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी पती-पत्नीमधील वादाचे एकूण ७६३ तक्रार अर्ज झाले होते. याची सरासरी काढली तर महिन्याला ६३ तर दिवसाला दोन ते तीन तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या वर्षी पहिल्या चार महिन्यांत ३३९ तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच महिन्याला ८४ तर दिवसाला ८ पेक्षा जास्त तक्रार अर्ज येत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पती-पत्नीतील तंटे पाहता यात दोघांमधील अहमपणा प्रमुख कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. वाद झाल्यानंतर माघार कोणी घ्यायाची यावर अढून

राहिल्याने या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. त्याप्रमाणे पतीचे मद्यप्राशन, कुटुंबात सतत भांडणे, अनैतिक संबंधांबाबत संशय, सासू सासऱ्यांची देखभाल, पतीच्या नातेवाईकांकडून टोमणे मारणे, वैयक्तिक स्वातंत्र्य न मिळणे या महिलांच्या तक्रारींची कारणे आहेत तर पतीच्या तक्रारीत या आई-वडिलांची पत्नीकडून

काळजी न घेणे, मोबाइलचा अतिवापर, मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष, अनैतिक संबंधांबाबत संशय या बाबी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेहमी कायम व्यस्त असलेले पती-पत्नी करोना र्निबधामुळे घरात अडकून पडले आहेत. जास्त वेळ समवेत घलवला जात असल्याने एकमेकांच्या उणिवाही समोर येत आहेत. त्यातून एकमेकांविषयी केलेल्या कल्पनेला छेद जात आहे. त्यातून वदाला सुरुवात होते. मात्र यात दोघेही अडून राहिल्याने या कौटुंबिक तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. या तक्रारींत आणखी वाढ होऊ  शकते अशी भीती महिला कक्षाकडून व्यक्त होत आहे.

यातील जास्त तक्रारी आम्ही समुपदेशानातून मिटविण्याचा प्रयत्न करत असतो, असे महिला कक्षातील पोलिसांनी सांगितले.

२०२०

जानेवारी ते एप्रिल कौटुंबिक वादाच्या एकूण २४७ अर्ज प्राप्त झाले असून सर्व तक्रारींचे समुपदेशन होऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी ६८ तक्रारींमध्ये समझोता घडवून आणला.

२०२१

जानेवारी ते एप्रिल ३३९ तक्रार अर्ज प्राप्त आहेत. त्यापैकी २९१ महिलांचे व ४९ अर्ज पुरुषांनी केले आहेत.

कौटुंबिक कलह जेव्हा समजुतीच्या पुढे जातो, तेव्हा पोलिसांकडे तक्रार येते. आम्ही समुपदेशनाद्वारेच हा कलह मिटवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. मुलांचे भवितव्य महत्त्वाचे असते. दुर्दैवाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त तक्रारी आल्या आहेत. बहुतांश प्रकरणात अहंपणा हे कारण असते.

-प्रवीण पाटील , उपायुक्त,

गुन्हे शाखा कौटुंबिक वादाची कारणे

  • अप्रामाणिकपणा
  • गैरसमज / संशय
  • कुटुंबात इतरांचे हस्तक्षेप
  • आर्थिक मानसिक फसवणूक
  • कौटुंबिक हिंसाचार
  • विसंवाद होणे
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The family feud escalated into tensions ssh