नवी मुंबई : नेरुळ सेक्टर ५८ खाडी किनारी दोन फ्लेमिंगो पक्षाचे मृतदेह आढळून आले. तर पामबीच रस्त्याच्या कडेला एक फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढळून आला. आज पहाटे फ्लेमिंगो पाम बीच रस्त्यावर आढळून आले असून त्यातील एकाचा गाडीला धडकून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारे नेरुळ जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फलकाला धडकून चार फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नवी मुंबई खाडी किनारा आता फ्लेमिंगो पक्षासाठी सुरक्षित आहे कि नाही असा संतप्त प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत. 

३ फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारीला नेरुळ जेट्टी कडे जाणाऱ्या रस्त्यावर चार फ्लेमिंगोचे मृतदेह आढळून आले होते. याच मार्गावर असणाऱ्या भल्यामोठ्या फलकाला धडकून हे पक्षी मृत झाले असल्याचा दावा त्यावेळी पर्यावरण प्रेमींनी केला होता. हि घटना ताजी असतानाच आज ( शुक्रवारी ) सकाळी नेरुळ सेक्टर ५८ ए येथील व्यंकटेश गृहनिर्माण संकुलच्या मागे असणाऱ्या कांदळवनात दोन फ्लेमिंगोचे मृतदेह आढळून आले.

आणखी वाचा-पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?

सकाळी सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी परिसरातील नागरिक येत असतात. आज सकाळी असाच फेरफटका मारण्यास आल्यावर दोन  फ्लेमिंगोचे मृतदेह आढळून आले. विशेष म्हणजे  काल (गुरुवारी) जेव्हा आम्ही प्रभात फेरी मारण्यासाठी या ठिकाणी आलो त्यावेळी हे मृतदेह नव्हते .  म्हणजे काल दिवसभरातुन अथवा रात्री अपरात्री फ्लेमिंगोचा मृत्यू झाला अशी माहिती माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली. तसेच फ्लेमिंगोचा मृत्यू नैसर्गिक झाला कि त्यांची हत्या झाली याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी एनआरआय पोलिसांकडे केली आहे. 

आणखी वाचा-घणसोली गावात पुन्हा १८ तास वीजविघ्न

याबाबत पर्यावरण वर काम करणारी नॅटकनेक्ट या सामाजिक संस्थेचे बी एन कुमार यांनी माहिती देताना सांगितले कि एकूण तीन फ्लेमिंगोचा मृत्यू झाला असून त्यातील दोन माजी नगर सेवक भरत जाधव यांच्या निदर्शनास आले तर अन्य एक  पक्षीप्रेमी हमराज खुराना यांना आढळून आला. खुराणा यांना अजून एक पक्षी पाम बीच वर फिरताना दिसला त्याचे चित्रीकरण त्यांनी समाज माध्यमात टाकले आहे.  

या बाबत कांदळवन विभाग अधिकारी सुधीर मांजरेकर यांनी सांगितले कि सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी चौकशीही केली जाईल