पनवेल – पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी खारघरमध्ये २०१४ साली घडलेल्या मीनाक्षी जैसवाल हत्येप्रकरणी तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मीनाक्षी जैसवाल या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या.

खारघर येथील वास्तू विहार सोसायटीमध्ये राहणाऱ्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा अॅड. मीनाक्षी जैसवाल यांची १८ डिसेंबर २०१४ मध्ये त्यांच्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल शनिवारी पनवेल न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. शिंदे यांनी जाहीर केला. त्यांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायाधीश शिंदे यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.जैसवाल यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या लुटीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मीनाक्षी यांचे मोटारचालक विनायक चव्हाण आणि त्याचे साथीदार मनिंदर बाजवा व सूरज जैसवाल यांना अटक करण्यात आली होती. या तिघांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या दिवशी मीनाक्षी यांचे पती मालेगाव येथील न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. पत्नीशी फोनवर संपर्क न झाल्यामुळे त्यांनी मित्रांना घरी पाठवले. त्यावेळी मीनाक्षी या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. खारघर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला नसला तरी परिस्थितीजन्य पुरावे सादर करत आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयात विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी सादर केले.  या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल्ल निकम यांनी २० साक्षीदार तपासून आरोपींनी दरोडा व चोरीच्या उद्देशाने मीनाक्षी यांचा खून केल्याचे सिद्ध केले. त्यांच्यासह अॅड. प्रसाद पाटील आणि अॅड. निशा ठाकूर यांनीही कामकाजात मोलाचे सहकार्य केले.