उरण : सध्या खोल समुद्रातील मासेमारीवर बंदीमुळे मच्छीमार नव्या बोटींच्या बांधणीत गुंतले आहेत. यात लाकडी बोटीऐवजी टिकाऊ व फायदेशीर असलेल्या फायबर बोटींना पसंती दिली जात आहे. लाकडाचा वापर कमी झाल्याने पर्यावरणाच्या संवर्धनास मदत होत आहे. अशा प्रकारच्या वर्षाला ५० पेक्षा अधिक बोटींची बांधणी केली जात आहे.

उरणच्या करंजा व मोरा बंदरात या बोटींची बांधणी करण्याचे काम सुरू आहे. मच्छीमार वर्षानुवर्षे लाकडी बोटींचा वापर करीत होते. या लाकडी बोटी बांधण्यासाठी दरवर्षी लाखो टन सागवान लाकडाचा वापर केला जात होता. फायबर बोट एकदा बांधली की किमान २० वर्षे तिचा विना देखभाल खर्च वापर करता येतो. तर नव्याने बोट वापरायची असल्यास केवळ बोटीचे इंजिन बदलल्यास त्याचा आणखी काही वर्षे वापर करता येतो. फायबरच्या बोटी या वजनाने हलक्या असल्याने लाकडाच्या बोटी प्रमाणे बोटी धडकेत फुटण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे नुकसान होत नाही. त्यामुळे खर्चही वाचतो. बोट अनेक वर्षे खराबही होत नाही. या कारणामुळे या बोटी फायद्याच्या ठरू लागल्या आहेत.

बोटींच्या लहान मोठ्या आकाराप्रमाणे त्या बांधणीचा खर्च येतो. यात ६० ते ७० लाखापासून १ कोटी ९० लाख रुपयां पर्यंतचा खर्च येतो. या बोटी साधारणपणे ७० फूट लांब,२९ फूट रुंद आणि १० ते ११ फूट खोलीच्या असतात.

मच्छिमारांना मासेमारी बोटी बांधतांना लाकडी बोटींसाठी एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लागत होता. मात्र त्याच आकाराच्या फायबरच्या बोटीच्या बांधणीसाठी अवघे तीन महिन्याचा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे कमी काळात टिकाऊ बोट तयार केली जात आहे, असे विनायक पाटील यांनी सांगितले.

मच्छीमार अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने लाकडी बोटींची बांधणी करीत होते. मात्र सध्या हलक्या टिकावू, मेंटेनन्स फ्री कमी वेळात तयार होणाऱ्या अशा फायबरच्या बोटीची बांधणी करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना फायदा होऊ लागला आहे. – रमेश नाखवा, ज्येष्ठ मच्छीमार, करंजा