उरण : तालुक्यातील भातशेतीची कापणी आणि मळणी सुरू असून त्याचवेळी जंगल परिसरातून याच शेतीवर रानडुकरे हल्ला करून शेतीची नासधूस करीत आहेत. यासंदर्भात वन आणि कृषी विभागाला माहिती देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षी परतीच्या पावसाने भात पिके तयार होण्याच्या अखेरच्या काळात पाऊस बरसल्याने भात पिके संकटात सापडली होती. आता पाऊस माघारी गेल्याने शेतकऱ्यांनी भात कापणी, बांधणी, झोडणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र शेतमजुरांच्या अभावी शेतकऱ्यांच्या भात पिकांच्या कापणीची कामे लांबवली आहेत.

हेही वाचा – फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद

शेतमजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या भात पिकांवर आता जंगली रानडुकरे मोकाट गुरे आणि जंगली वानरांचा मुक्त संचार होत असल्यामुळे चिरनेर गावासह परिसरातील अन्य गावांतील शेतकरी त्रस्त झाले आहेत. भातशेती कापणीला आली असताना, मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील काही शेतकऱ्यांच्या भात पिकांची रानडुकरांनी एवढी नासाडी केली आहे की, ही भातपिके कापणी-बांधणीच्या लायक राहिली नसल्यामुळे नासाडी झालेल्या भात पिकांची कापणीच केली नसल्याचे शेतकरी कृष्णा म्हात्रे, दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा – हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कळपाने पिकांवर हल्ला करणारी रानडुकरे आणि मोकाट गुरे हिरावून नेत असल्याने वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, आवरे, साई, दिघाटी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. तालुक्यात रानडुकरांपासून भात पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री पहारा देण्याची वेळ ओढवली आहे. मात्र भात पिकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रतिकारात रानडुक्कर मारले गेल्यास शेतकऱ्याविरुद्ध शिकारीचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कोणीही असा प्रतिकार अथवा बंदोबस्त करण्याच्या मनस्थिती दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत वनखाते, कृषी विभाग ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडे वारंवार या प्राण्यांपासून नुकसान होत असल्याच्या लेखी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran wild boars damage paddy fields neglect of forest agriculture department ssb