उरण : उरण ते नेरुळ/बेलापूर या मार्गावरील महत्वाच असलेल्या गव्हाण स्थानकाला थांबा द्या अशी मागणी जासई ग्रामस्थांनी केली आहे. उरण ते नेरुळ/ बेलापूर या लोकल मार्गावरील वरील खारकोपर नंतर येणाऱ्या गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आहे. स्थानकातील फलाटाचे,तिकीट कार्यालय,वाहनतळ तसेच स्थानकातील इतर सुविधांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
काही महिन्या पूर्वी हे स्थानक लवकरच सुरू करण्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले होते. मात्र या स्थानकाला आज पर्यंत थांबा दिलेला नाही. त्यामुळे या स्थानकाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. येथील प्रवाशांना याची प्रतीक्षा आहे. तर स्थानकाच काम सुरू असल्याचाही दावा रेल्वे विभागाने केला आहे.
१२ जानेवारी २०२४ ला पंचवीस वर्षे रखडलेल्या उरण ते खारकोपर मार्गावरील गव्हाण स्थानकाच काम अनेक महिन्यानंतरही अपूर्णच आहे. सध्या या स्थानकाच्या फलाटावरील फरशी पॉलिशचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे तिकीट घर,वाहनतळ स्वछतागृह आदींची कामे वेगाने सुरू आहेत. उरण ते नेरुळ/ बेलापूर या लोकल मार्गावरील पाचवे स्थानक गव्हाण आहे.
या स्थानकाचे काम उशिराने सुरू झाले आहे. हे स्थानक भविष्यात महत्वाचे आणि रहदारीचे बनणार आहे. कारण या परिसरात दहा पेक्षा अधिक गावांचा परिसर आहे. तसेच जासई हे उरण तालुक्यातील मुख्य ठिकाण आहे. सुरुवातीला गव्हाण स्थानकासाठी भूसंपादन होत नसल्याने अनेक वर्षे हा संपूर्ण मार्गच रखडला होता. त्यानंतर येथील शेतकऱ्यांना संपादीत जमिनीच्या मोबदल्यात द्यावयाचे भूखंड न मिळाल्याने काम रखडले होते. आशा अनेक संकटात या स्थानकाचे काम रखडले होते.
गव्हाण रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामामुळे येथील नागरीक विद्यार्थी आणि प्रवासी यांना खारकोपर स्थानकात जावे लागत आहे. गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झालं तरी हे स्थानक कधी सुरू होणार हे निश्चित नाही. कारण खारकोपर ते नेरुळ/बेलापूर मार्गावरील तरघर हे स्थानक सुरू होण्यास उशीर झाला होता. या संदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांनी माहीती घेऊन सांगतो असे उत्तर दिले आहे.
नामविस्तार होणार का ? गव्हाण स्थानक हे जासई आणि गव्हाण या दोन महसूल हद्दीत आहे. त्यामुळे या स्थानकाला गव्हाण जासई नाव देण्याची मागणी केली जात आहे. तशी मागणी सिडको आणि रेल्वे कडे केली असल्याची माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गव्हाण स्थानकाला लवकरात लवकर थांबा देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.