ऐरोली येथील मंडळाचा अनोखा उपक्रम
ऐरोली येथील श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळात झालेल्या हरिनाम सप्ताहाची धुरा पूर्णपणे महिलांनी वाहिली आणि आध्यात्मिक व्यासपीठावरही आपण मागे नसल्याचे सिद्ध केले. १४ डिसेंबरपासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात काकडआरतीपासून ते हरिकीर्तनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलांनी पेलल्या. देणगी जमा करण्यापासून ते काल्याच्या प्रसादापर्यंतची सर्व कामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्याला पुरुष वारकऱ्यांनी उत्तम साथ दिली.
साधारणपणे हरिनाम सप्ताहाच्या आयोजनापासून आध्यात्मिक प्रवचन, कीर्तन, भजन, श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ यात पुरुषांचेच वर्चस्व दिसते. महिला केवळ श्रोत्यांच्या भूमिकेत दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी ऐरोली येथील श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळातील महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला विरोध झाला. महिला कीर्तनकार असल्यास सहभागी होणार नाही, अशी ताठर भूमिका घेण्यात आली. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हा मान महिलांना मिळाला नव्हता. सप्ताहाचे हे २३ वे वर्षे आहे.
मंडळातील बिंदू केसरकर, स्मिता तेलवणे, शारदा डुंबरे, निर्मला खरबस, गीता राव, उषा जाधव, मंदा मुन्ने, रेणुका माने, कुसुम कोलते, कल्पना यादव, ज्योती टावरे या महिलांनी यंदा संपूर्ण जबाबदारी घेतली. देणगी, अन्नदाते, अल्पोपाहारदाते यांची तजवीज केली. १४ ते २१ डिसेंबरदरम्यान विठ्ठल रुखमाई महिला भजन मंडळ, रुक्मिणी महिला भजन मंडळ, विश्वेश्वर महिला भजन मंडळ, कृष्णदास महिला भजन मंडळ, विठ्ठल रखुमाई मंडळ, श्रीराम भजन मंडळ, संत ज्ञानेश्वर महिला भजन मंडळाने दुपारच्या भजनाची जबाबदारी पार पाडली तर संध्याकाळी सुलक्षणा पवार, पार्वती साळे, ज्योतीताई अडागळे, लता वाघ, मंदा उदमले, संगीता काटोळे, संगीता ननावरे यांनी सुश्राव्य प्रवचन दिले. अपर्णा साळवी (डोंबिवली), नम्रता मोरे (खेड), ज्ञानेश्वरी बागुल(नाशिक), भगवतीबाई सातारकर (नवी मुंबई), संगीता चोपडे (घाटकोपर), शीतल साबळे (औरंगाबाद), अश्विनी म्हात्रे (डोंबिवली) यांच्या कीर्तनाला अलोट गर्दी जमली. म्हात्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाचा गोड शेवट झाला. या क्षेत्रातही ‘हम भी कुछ कम नही’ हे महिलांनी दाखवून दिले आहे.
२३ वर्षे हा सप्ताह सुरू आहे, पण महिलांना संधी मिळाली नव्हती. यंदा महिलांनीच सर्व धुरा सांभाळून हा सप्ताह करण्याचे ठरविले. पुरुष सदस्यांनीही आनंदाने होकार दिला. सर्व प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, पारायणे महिलांनी केली. समाजमाध्यमांवर अपप्रचार केला गेला पण पाठिंबा देणारे जास्त होते.
– बिंदू नारायण केसरकर, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ