X
X

भू तंत्र वस्त्रे – भाग १

READ IN APP

मजबुतीकरण : मातीच्या थरांना जेव्हा रेषीय (टेन्साइल) ताणाला सामोरे जावे लागते

जमिनीखालील व जमिनीसंबंधित वापरासाठी जी तांत्रिक वस्त्रे उपयोगात आणली जातात त्यांना ‘भू तंत्र वस्त्रे’ असे संबोधण्यात येते. भू तंत्र वस्त्रांचा उपयोग प्रामुख्याने चार प्रमुख कारणांसाठी केला जातो.
अलगीकरण : जमिनीचे किंवा मातीचे वेगवेगळे थर किंवा भाग एकमेकांत मिसळू नयेत याकरिता भू तंत्र वस्त्रांचा वापर करण्यात येतो. उदा. रस्त्याच्या बांधकामामध्ये खालील मातीच्या वर वेगवगळे थर बनविले जातात. हे थर आणि खालील माती एकमेकांत मिसळल्यास रस्त्याचे आयुष्यमान कमी होते. अशा ठिकाणी हे थर वेगळे राहावेत यासाठी भू तंत्र वस्त्रांचा वापर केला जातो.
गाळण क्रिया : गाळण प्रक्रियेसाठी भू तंत्र वस्त्रांचा फार मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. माती व पाणी यांचे जेव्हा मिश्रण होते त्या वेळी माती संरक्षित ठेवून भू तंत्र वस्त्रामधून पाणी गाळून बाजूला केले जाते. अलगीकरण व गाळण प्रक्रिया या दोन्ही क्रिया थोडय़ाफार फरकाने सारखेच काम करतात, परंतु जेव्हा दोन किंवा अधिक मातीचे थर वेगळे करायचे असतात तेव्हा त्या क्रियेस अलगीकरण असे म्हणतात आणि जेव्हा माती आणि पाणी यांच्या मिश्रणातून हे दोन्ही पदार्थ वेगळे करावयाचे असतात तेव्हा त्या क्रियेस गाळण क्रिया असे म्हणतात.
मजबुतीकरण : मातीच्या थरांना जेव्हा रेषीय (टेन्साइल) ताणाला सामोरे जावे लागते त्या वेळी त्यांना मजबुती देण्यासाठी भू तंत्र वस्त्रांचा वापर केला जातो. माती किंवा दगड हे दाबाच्या (कंप्रेसिव्ह फोर्स) बलापुढे चांगला टिकाव धरू शकतात, परंतु रेषीय ताणाला ते टिकू शकत नाहीत.
वहन (ट्रान्समिशन) : जमिनीशी लगत असलेले द्रव पदार्थ अथवा वायू पदार्थ वाहून नेण्यासाठी अशा भू तंत्र वस्त्रांचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेनेज व्यवस्थांमध्ये अशा वस्त्रांचा वापर होतो.
अर्थातच भू तंत्र वस्त्राचा वापर जसा भिन्न त्याप्रमाणे त्याची रचना वेगळी असते. त्या त्या भू तंत्र वस्त्राकडून जे कार्य अपेक्षित आहे, ते लक्षात घेऊन त्याची निर्मिती प्रक्रियापण बदलते.

चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

पुदुक्कोटाची भरभराट

१८०० साली तामिळनाडूतील पुदुक्कोटा हे ब्रिटिशअंकित संस्थान झाले. तोंडैमान राज्यकर्त्यांनी ब्रिटिशांना आणि अरकाटच्या नवाबाला १७५२ साली त्रिचनापल्लीच्या वेढय़ात, हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याविरोधात मदत केली. तसेच तामिळनाडूतील शिरजोर झालेल्या छोटय़ा जमीनदारांच्या बंडामध्ये लष्करी मदत केल्यामुळे पुदुक्कोटा राज्यकत्रे ब्रिटिशांचे एक निष्ठावंत मित्र बनून राहिले. पुदुक्कोटा राज्याचा विकास रामचंद्र आणि मरतड तोंडैमान या राज्यकर्त्यांच्या काळात होऊन ते एक वैभवसंपन्न आणि सांस्कृतिक केंद्र बनून राहिले. याचे श्रेय राज्याचे कर्तृत्ववान दिवाण शेषय्या शास्त्री यांना जाते. शहराच्या मध्यभागी तलाव बांधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लावून शेषय्यांनी पुदुक्कोटाच्या पंचक्रोशीतील रस्त्यांची पुनर्बाधणी केली. पुदुक्कोटातील पुरातन मंदिरांच्या नूतनीकरणात लक्ष घालून शहरात प्राथमिक शिक्षण शाळा स्थापन केल्या. गेल्या ३०० वर्षांपासून उत्साहात साजरा होणाऱ्या बृहदम्बल या दैवताचा उत्सव आणि नवरात्रोत्सव सार्वजनिक करण्यात शेषय्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शेषय्या शास्त्रींची १८७८ साली तत्कालीन मद्रास विधान परिषदेवर नियुक्ती झाली. शेषय्या शास्त्रींप्रमाणेच पुदुक्कोटाचे दुसरे दिवाण अलेक्झांडर टोटेनहॅम यांनाही पुदुक्कोटा संस्थानाच्या विकासाचे श्रेय जाते. या दोन दिवाणांनी राज्यात रेशीम उत्पादन, वस्त्रोद्योग, बेलमेटलची भांडी, सुगंधी द्रव्ये, शेंगदाणा यांच्या उत्पादनाला प्राधान्य देऊन त्यांची निर्यात सुरू केली. अठराव्या शतकाच्या मध्यावर त्यांनी पुदुक्कोटामध्ये न्यायसभा म्हणजे सिव्हिल कोर्ट, दंडसभा म्हणजे क्रिमिनल कोर्ट आणि मुद्रासभा अशी तीन न्यायालये सुरू केली. ब्रिटिशांनी या संस्थानाला ९ तोफा सलामीचा मान दिला होता. १ मार्च १९४८ रोजी पुदुक्कोटा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

20
X