अंकगणितातली आकडेमोड सुलभतेने करण्यासाठी बनवण्यात आलेल्या गणनयंत्रांची परंपरा खूप जुनी आहे. याची सुरुवात ‘अबॅकस’ या साधनाद्वारे इ.स.पूर्व ३००० ते इ.स.पूर्व २७०० या काळात मेसोपोटेमियात (आजचा इराक) झाली असावी. या अबॅकसमध्ये खाचांत बसवलेले दगडगोटे पुढेमागे सरकवून आकडेमोड केली जायची. या पारंपरिक पद्धतीतील एक मोठा बदल म्हणजे सतराव्या शतकाच्या सुरुवातीस जॉन नेपियरने वापरात आणलेली लॉगॅरिदमची पद्धत. या आकडेमोडीसाठी तक्त्यांचा आधार घेतला जातो. याच सुमारास विल्यम ऑघट्रेड याने ‘स्लाइड रूल’ हे यांत्रिकी गणनयंत्र बनवले. या साधनातील पट्टय़ांवर लॉगरिथमिक स्केलमध्ये आकडे लिहिलेले असतात. या पट्टय़ा पुढेमागे सरकवून, विविध संख्यांच्या लॉगॅरिदमच्या बेरीज-वजाबाकीद्वारे त्यांचे गुणाकार-भागाकार केले जातात.

सन १८२१ मध्ये चार्ल्स बॅबेज या ब्रिटिश वैज्ञानिकाला, खगोलशास्त्रातली गणिते करताना त्यासाठी एका स्वयंचलित यंत्राची कल्पना सुचली. त्यातूनच त्याने ‘डिफरन्स इंजिन’ची आखणी केली. नावाप्रमाणेच दोन संख्यांमधल्या फरकावर हे यंत्र आधारलेले होते. पुन:पुन्हा बेरीज-वजाबाकी करून गुणाकार-भागाकार करण्याची पद्धत बॅबेजने या यंत्रासाठी सुचवली होती. गियरच्या मदतीने चक्रे फिरवून यात संख्यांची आकडेमोड केली जाणार होती. मात्र सन १८३४ मध्ये बॅबेजने त्याच्या डिफरन्स इंजिनाच्या संकल्पनेला बाजूला ठेवले आणि तो त्याहीपेक्षा प्रगत अशा ‘अ‍ॅनालिटिकल इंजिन’च्या संकल्पनेवर तो काम करू लागला. बॅबेजने आखलेले हे अ‍ॅनालिटिकल इंजिन म्हणजे खऱ्या अर्थाने कोणत्याही कामासाठी वापरला जाऊ शकणारा संगणकच होता. या गणनयंत्रात आधुनिक संगणकाप्रमाणे माहिती साठवण्यासाठी वेगळी मेमरी (स्टोअर) आणि गणिते करण्यासाठी वेगळे अ‍ॅरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट (मिल) होते आणि या यंत्राला प्रोग्रामिंग करायची सोयही होती.

बॅबेजने जरी डिफरन्स इंजिनचा आणि अ‍ॅनालिटिकल इंजिनचा आराखडा बनवला असला, तरी खूप प्रयत्न करूनही त्याला तो प्रत्यक्षात आणता आला नाही. अगदी अलीकडे म्हणजे २००२ मध्ये, वैज्ञानिकांना सतरा वर्षांच्या मेहनतीनंतर, बॅबजेच्या आखणीप्रमाणे असलेले आणि चालू शकणारे डिफरन्स इंजिन बनवण्यात यश आले. लंडन सायन्स म्युझियममध्ये उभ्या असलेल्या या डिफरन्स इंजिनाची लांबी सुमारे सव्वातीन मीटर, उंची दोन मीटर आणि वजन पाच टन आहे. दुर्दैवाने वैज्ञानिकांना बॅबेजच्या आराखडय़ातले अ‍ॅनालिटिकल इंजिन आजही तयार करता आलेले नाही, पण त्यासाठी त्यांचा प्रयत्न मात्र चालू आहे.

– मकरंद भोसले मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org