हर्बर्ट बॉयर हे १९५८ साली जीवशास्त्राचे आणि रसायनशास्त्राचे पदवीधर झाले. त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठात पीएच.डी.साठी जनुक संरचन नियमावली (जेनेटिक कोड) यावर संशोधन केले आणि १९६३ साली पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
पीएच.डी.चे संशोधन करत असताना गुणसूत्रातील डीएनए एका जीवाणूतून दुसऱ्या जीवाणूत कसे शिरत असावे, हे कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. या विषयावरील पुढच्या संशोधांनासाठी ते १९६३ साली एडवर्ड एडेलबर्ग यांच्या विभागात येल विद्यापीठात दाखल झाले. १९६६ पर्यंत ते प्लस्मिडचे शुद्धीकरण आणि जीवाणूमधील डीएनए कापणारी किंवा ते बदलणारी विकरे यांचा अभ्यास करत होते. १९६६ साली त्यांच्या लक्षात आले की, या विकरांमुळे डीएनए कापून पुन्हा जोडता येईल व डीएनएच्या गुणधर्मांचा अभ्यास करता येईल.
सनफ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रामधील सहाय्यक प्रोफेसरचे पद स्वीकारले. पेशी डीएनएमधील वैशिष्ट्यपूर्ण बेसेसचा क्रम कसा ओळखता येईल यासाठी १९७२ साली डीएनए कापणारी (रेस्ट्रिक्शन) आणि बदलणारी विकरे (एन्झाइम मॉडिफिकेशन) यावर त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांचा पीएच.डी.चा विद्यार्थी बॉब हेलिंग याने इश्चेरीशीय कोलायमधील डीएनए कापणारे एक विकर शोधून काढले.
त्याचे नाव ‘ईको आर आय’ ( एू फक). या विकराचा फायदा म्हणजे डीएनएच्या शेवटी तयार झालेले पसरणारे एकेरी धागे या विकरच्या मदतीने परत एकत्र जोडू शकत होते. लगेचच त्यांनी स्टानफोर्ड विद्यापीठाच्या डॉक्टर स्टान्ली कोहेन यांच्या मदतीने पहिला संयोजित डीएनएचा रेणू बनवला. तो बनवण्यासाठी त्यांनी स्वत: तयार केलेले विकर आणि स्टान्ली कोहेन यांचे प्लस्मिड तंत्रज्ञान उपयोगात आणले.
त्यांनी भांडवलदार रॉबर्ट स्वानसन यांच्या मदतीने १९७६ मध्ये जैवतंत्रज्ञान वापरणारी पहिली व्यापारी कंपनी ‘जेनेन्टेक’ प्रस्थापित केली.१९७६ ते १९९१ या प्रदीर्घ काळात ते या कंपनीचे उपाध्यक्ष होते. १९८२ साली त्यांनी इलाय-लिले या कंपनीशी करार करून ‘ह्युमिलीन’सारखे मानवी इन्शुलीनसारखे प्रथिन तयार करून त्याला औषध व अन्न प्रशासनाची मान्यता मिळवली. हे जैवतंत्रज्ञानाने निर्मित जगातील पहिले उत्पादन ठरले.
१९८० साली त्यांना लास्कर पुरस्काराने, १९९० साली नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि २००७ साली पार्किन मेडलने सन्मानित करण्यात आले. त्यांचे १००हून अघिक लेख न्यूक्लेइक अॅसिड, जीन, बायोटेक्नॉलॉजी यासारख्या संशोधनपत्रिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
– डॉ. रंजन गर्गे,
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org