इ.स.पूर्व पाचव्या शतकातील ग्रीक वैद्यकतज्ज्ञ हिप्पोक्रेटस याने धमन्या (आर्टरी) आणि शिरा (व्हेन), या रक्त वाहून नेणाऱ्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या संस्था असल्याचे मानले होते. त्यानंतर इ.स.नंतर दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या गॅलन या ग्रीक वैद्यकतज्ज्ञानेही याबाबतीत हिप्पोक्रेटसशी सहमत होऊन, रक्ताची निर्मिती ही खाल्लेल्या अन्नाद्वारे यकृतात होत असल्याचे म्हटले होते. अवयवांना लागेल तसे यकृताकडून सतत ताजे रक्त पुरवले जात असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. गॅलनची ही संकल्पना त्यानंतर अनेक शतके प्रचलित होती.
इटलीतील फॅब्रिशियस याने सोळाव्या शतकात शिरांमधील झडपांचा शोध लावला. त्यानंतर फ्रॅबिशियसचाच विद्यार्थी असणाऱ्या इंग्लिश वैद्यकतज्ज्ञ विल्यम हार्वी याने या झडपांचे कार्य एका प्रयोगाद्वारे स्पष्ट केले. एका माणसाच्या दंडाला त्याने एक फडके घट्ट बांधले. त्यामुळे कोपराखालच्या हातातील शिरांतून होणारा रक्तप्रवाह थांबला आणि शिरा फुगल्या. फॅब्रिशियसने शोधलेल्या शिरांतील झडपा आता उंचवटय़ाच्या स्वरूपात दिसू लागल्या. हार्वीने या शिरा दाबून हाताच्या बोटांच्या दिशेने शिरांतील रक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. रक्त सरकले नाही. परंतु जेव्हा त्याने हे रक्त विरुद्ध म्हणजे कोपराच्या दिशेने सरकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र रक्त पुढे सरकले. शिरांतून एकाच दिशेने रक्त वाहू शकते हे यावरून स्पष्ट झाले.
हार्वीने लावलेला अतिशय महत्त्वाचा शोध म्हणजे रक्ताभिसरणाचा. हृदयाच्या कप्प्यांत किती रक्त मावू शकते, हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी त्यातील किती रक्त बाहेर ढकलले जाते, मिनिटाला हृदय किती वेळा आकुंचन पावते (म्हणजे हृदयाचे ठोके), या घटकांवरून त्याने हृदयातून अर्ध्या तासात सुमारे चौदा-पंधरा लिटर रक्त बाहेर पडत असल्याचे गणित मांडले. इतक्या मोठय़ा प्रमाणात यकृताद्वारे सतत रक्ताची निर्मिती करणे शक्य नसल्याचे मत त्याने व्यक्त केले. याचाच अर्थ तेच रक्त पूर्ण शरीरभर पुन:पुन्हा अभिसरणाद्वारे फिरते आहे. आपली रक्ताभिसरणाच्या विषयीची ही मते सिद्ध करण्यासाठी, विल्यम हार्वीने प्राण्यांवरही अनेक प्रयोग केले. आपले हे सर्व संशोधन १६२८ साली त्याने आपल्या ‘डीमोटू कॉर्डिस’ (रक्ताची हालचाल) या लॅटिन भाषेत लिहिलेल्या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केले. वैद्यकशास्त्राच्या इतिहासात हे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणून गणले गेले आहे.
डॉ. अंजली कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org