श्रुती पानसे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परीक्षेसाठीचा अभ्यास जर आनंदात गुंफायचा असेल तर काही गोष्टी पालकांनी करायला हव्यात. मुलांसाठी टाइमटेबल आखताना त्यांच्या वयाचा आणि ताणाचा विचार करावा. दुसरी तिसरीपर्यंतची मुलं जास्त वेळ एका जागी बसून अभ्यास करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन छोटय़ा काळासाठी त्यांना अधूनमधून अभ्यासातून उठण्यासाठी वेळ ठेवावा. त्याच वेळेला त्यांनी अभ्यास आणि त्यानंतर थोडा वेळ हिंडणं- फिरणं- छोटासा व्यायाम असं केलं तर मुलं एकाग्रतेने अभ्यास करतील.

मधल्या काळात त्यांच्या हातात मोबाइल देण्यापेक्षा किंवा टीव्ही बघितला तरी चालेल असं म्हणण्यापेक्षा गप्पा मार, जागच्याजागी उडय़ा मार, सायकलवर चक्कर मारून ये, कुंडय़ांना पाणी घालून ये, मित्राशी-मत्रिणीशी फोनवर बोल, आवडत्या माणसांशी बोल या मार्गामुळे त्यांचा अभ्यासाचा ताण अधून-मधून हलका होईल.

कोणत्याही इयत्तेमध्ये असली तरीसुद्धा मुलं जर एखादा मदानी खेळ खेळत असतील किंवा नृत्याच्या क्लासला जात असतील तर ते उपक्रम चालू ठेवावेत. कारण यामुळे मुलांच्या मेंदूला ऑक्सिजन मिळतो. रक्ताभिसरण वाढल्यामुळे शरीर आणि मेंदू तरतरीत होतो. अशी मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील. याशिवाय परीक्षा चांगली जाण्यासाठी सात ते आठ तासांची रात्रीची झोप होणं हे देखील स्मरणशक्तीसाठी आणि मेंदू ताजातवाना राहण्यासाठी फार आवश्यक असतं. थोडा अभ्यास लेखी आणि थोडा अभ्यास तोंडी असं जर वर्गीकरण केलं तर मुलांना अभ्यास सोयीचा आणि सोपा होईल.

अर्थ न कळता पाठांतर केल्याचा काहीही उपयोग अभ्यासात आणि परीक्षेमध्ये होत नाही.

मुलं घरी आली की काही पालक तो पेपर तोंडी सोडवून घेतात. आधीच्या पेपरचं दडपण नव्या पेपरवर येऊ शकतं. त्यामुळे उद्याच्या पेपरची तयारी करणं हेच योग्य ठरतं. अशा वेळेला आई बाबांनी त्यांना वाटणारा ताण मुलांवर लादला जात नाही आहे ना, हे बघितलं पाहिजे, मुलांचं मन शांत आणि स्वस्थ असेल तर मुलं अशा परीक्षा चांगल्या देऊ शकतील. सध्या तरी जी काही परीक्षा पद्धती आहे तोपर्यंत याच परीक्षा पद्धतीला मुलांना सामोर जायचं आहे!

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on brain