भक्ष्य म्हणून निवडलेल्या प्राण्याचा प्रचंड वेगाने पाठलाग करणारा, कमनीय बांध्याचा चित्ता आपल्या परिचयाचा आहे. त्याचे शरीर म्हणजे एक अचूकपणे पळणारे यंत्रच! त्याच्या नष्ट होत चाललेल्या अधिवासामुळे विसाव्या शतकातच तो भारतातून नामशेष झाला. सध्या तो आफ्रिका, नामिबिया वगैरे ठिकाणी सापडतो. पिवळ्या रंगाच्या शरीरावर काळे भरीव ठिपके आणि डोळ्यांच्या आतील कोपऱ्यातून खालपर्यंत येणारा काळा ओघळ ही त्याची ओळख. वेगासाठी बनलेले अवघे शरीरच जणू.. चित्ता जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. तो साधारणत: ताशी ११५-१२० किमी या वेगाने पळू शकतो. त्याच्या शरीररचनेबरोबरच त्याचे अवयवदेखील वेगासाठीच अनुकूल असतात. वेगाने धावताना त्याची चपटी शेपटी ‘रडार’सारखे काम करते. त्याची फुप्फुसे, यकृत, हृदय हे अवयव आकारमानाने मोठे असतात. विशेषत: श्वसनसंस्था वेगासाठी सज्ज असते, ज्यायोगे वेगाने धावताना जास्त प्राणवायूचा पुरवठा होतो. त्याच्या पाठीचा कणा लांब आणि लवचीक असतो; त्यामुळे एका झेपेत तो मोठे अंतर पार करू शकतो. पळताना त्याचे डोके स्थिर आणि नजर केवळ भक्ष्यावर केंद्रित असते. वायुगतिशास्त्रीय (एरोडायनॅमिक) शरीर, वजनाने हलका सांगाडा, लांब-सडपातळ पाय, थोडेसे आत ओढून घेता येणारे पंजे, वेधक नजर, कमी लांब असलेले सुळे, लांब, स्प्रिंगप्रमाणे असलेली अस्थिबंधन, छोटे डोके, गोलसर कान.. जणू निसर्गाने छिन्नी चालवून वेगासाठी तयार केलेले शरीरच!

वेगाने पळणाऱ्या चित्त्याचे चारही पाय जास्त काळ जणू हवेतच असतात. त्याचे पंजे वेगाने पळताना जमिनीला अगदी कमी स्पर्श करतात आणि त्याच्या वक्र नखांमुळे कर्षण वाढण्यास मदत होते. त्याच्या शरीरात ‘फास्ट ट्विच’ या प्रकारचे स्नायू खूप जास्त असतात. ते स्नायू काही मिनिटेच कार्यरत राहू शकतात, त्यामुळे त्याचा प्रचंड वेग साधारणत: १६००-१८०० फुटांहून जास्त अंतरानंतर टिकू शकत नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चित्त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग वेगासाठी अनुकूल झाला आहे. चित्ता म्हणजे उत्क्रांतीचे एक सुंदर उदाहरण म्हणावे लागेल.

चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला होता. हा प्राणी आता परत भारतात आणून जंगलात सोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मध्य प्रदेशातील जंगलात चित्ता सोडण्यात येणार आहे. आशियाई चित्ता आता फक्त इराणमध्ये, तोही अत्यंत कमी संख्येत आहे; म्हणून आता आफ्रिकी चित्ता भारतात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी संवेदनशील राहणे ही आपली जबाबदारी आहे.

डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२