सुनीत पोतनीस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोल्ड कोस्ट या पश्चिम आफ्रिकेतील वसाहतीला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्वामे नक्रुमा यांनी त्या प्रदेशातल्या आणखी पाच नेत्यांना घेऊन ‘युनायटेड गोल्ड कोस्ट कन्व्हेन्शन (यूजीसीसी)’ ही संघटना १९४७ साली स्थापन केली. नक्रुमा यांनी ‘कन्व्हेन्शन पीपल्स पार्टी (सीपीपी)’ हा पक्ष स्थापन करून संघटनेतर्फे गांधीवादी पद्धतीने अहिंसक निदर्शने, संप, सत्याग्रह आदींचा अवलंब करून ब्रिटिश सरकारशी असहकार सुरू केला.

ब्रिटिशांनी या नेत्यांशी बोलणी करून अखेर ६ मार्च १९५७ रोजी गोल्ड कोस्टला स्वातंत्र्य देत असल्याचे जाहीर केले. या नेत्यांच्या सल्ल्याने ६ मार्चच्या रात्री १२ वाजता स्वातंत्र्याची घोषणा करताना ब्रिटिशांनी या नवदेशामध्ये गोल्ड कोस्ट, अशेन्ती राज्यक्षेत्र, उत्तरेतला काही प्रदेश आणि ब्रिटिश टोगोलॅण्ड हे प्रदेश समाविष्ट केले. हे चार प्रदेश एकत्र करून अस्तित्वात आलेल्या या देशाला ब्रिटिशांनी पश्चिम आफ्रिकेत प्राचीन काळात असलेल्या घाना या लोकप्रिय साम्राज्याचे नाव दिले. या नवजात घानाला राष्ट्रकुल संघटनेचे (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स) सदस्यत्व दिले गेले.

१ जुलै १९६० रोजी घानामध्ये पहिली अध्यक्षीय निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत क्वामे नक्रुमा बहुमताने निवडून आले. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी हातात घेतल्यावर त्याच दिवशी, म्हणजे १ जुलै रोजी घानामध्ये प्रजासत्ताक सरकार स्थापन केल्याची घोषणा केली. ६ मार्च १९५७ या दिवशी नवदेश घाना अस्तित्वात आला आणि तोच या देशाचा स्वातंत्र्य दिन, तर १ जुलै हा प्रजासत्ताक दिन! नक्रुमा हे घानाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले. घानाचा विकास करताना सर्व आफ्रिकी देशांमध्ये एकात्मता साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

२४ फेब्रुवारी १९६६ रोजी नक्रुमा व्हिएतनामच्या दौऱ्यावर असताना इकडे घानाचे लष्करप्रमुख इमॅनुएल कोटोका यांनी नक्रुमांचे लोकशाही सरकार उलथवून लष्करी राजवट स्थापली. पुढे १९६६ ते १९८१ या काळात तिथे कधी लष्करी, तर कधी नागरी सरकारने कारभार हाकला. १९८१ पासून २००० सालापर्यंत घानामध्ये सर्व निवडणुकांत जेरी रॉलिंग्ज यांच्या पक्षास बहुमत मिळाले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्यापूर्वीच्या लष्करी सरकारच्या कार्यकाळात घानाच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी रॉलिंग्ज यांनी प्रशासकीय कार्यपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. त्यांचे सुपरिणाम १९८० नंतर दिसू लागले.

sunitpotnis94@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on kotoka via nakruma to rawlings abn