– सुनीत पोतनीस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून ४०० किमीवर, हिंदी महासागराने वेढलेले मादागास्कर बेट गेल्या शतकात देश म्हणून ओळखले जाऊ लागले. या बेटावरील जैववैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य. जगात बाकी कुठेही न आढळणाऱ्या प्रजातींच्या वनस्पती, कीटक व प्राणी या देशात आढळतात. ‘ग्रेट रेड आयलँड’ या नावानेही ओळखले जाणारे मादागास्कर बेट हे जगातल्या चौथ्या क्रमांकाचे मोठे द्वीपराष्ट्र आहे. २६ जून १९६० रोजी स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आलेल्या मादागास्करच्या भूमीवर मानवी वस्ती झाली सुमारे २००० वर्षांपूर्वी. या बेटावर स्थायिक लोकांना ‘मालागासी’ म्हणतात. सर्वप्रथम इथे इंडोनेशियाचे लोक हिंद महासागरातून आले. त्यानंतर अरबी व्यापारी आणि पूर्व आफ्रिकी लोक इथे स्थायिक झाले.

मादागास्करमधील बहुतांश मालागासी जनता ही इंडोनेशियन व आफ्रिकी लोकांपासून झालेली उत्पत्ती आहे असे समजले जाते. या लोकांवर आफ्रिकी संस्कृतीचा प्रभाव असला तरी शरीरयष्टी, वर्ण यांत भिन्नता दिसून येते. त्यातही पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात राहणारे कृष्णवर्णीय उंचेपुरे- स्वत:ला ‘साकालावा’ म्हणवून घेणारे; पूर्वेकडील प्रदेशातले ‘एंटाईमोरो’; तर मध्य प्रदेशातले लोक इंडोनेशियन लोकांसारखे दिसणारे आहेत. तीन कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मादागास्करच्या लोकांमध्ये २० वांशिक गट आहेत. आग्नेय आफ्रिकेची भूमी मादागास्करपासून फक्त ४०० किमीवर असली तरी मालागासी म्हणजे मादागास्करचे लोक स्वत:ला आफ्रिकी समजत नाहीत. अनेक वर्षे मादागास्कर फ्रेंच अमलाखाली त्यांची एक वसाहत म्हणून राहिल्याने, या बेटाचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक लागेबांधे फ्रेंच वसाहत म्हणून राहिलेल्या, फ्रेंच बोलणाऱ्या पश्चिम आफ्रिकी देशांशी आणि फ्रान्सशी आहेत.

अरबी व्यापारी मादागास्करच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये आठव्या शतकात येऊन व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले. इ.स. १५०० साली एका पोर्तुगीज जहाजाचा कप्तान दिओगो डिआस भारताकडे येताना चुकून मादागास्कर किनाऱ्यावर आला. मादागास्करात आलेला हाच पहिला ज्ञात युरोपीय! त्याने या बेटाला ‘सेंट लॉरेन्स’ हे नाव दिले. त्यामुळे पुढे युरोपीय लोक मादागास्करला याच नावाने ओळखत होते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on madagascar of malagasy abn