कुतूहल : स्टॉकहोम परिषद, १९७२

कोणत्याही देशातील कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे वायू हवेत मिसळून सीमापार अन्य कोणत्याही देशाच्या हद्दीत प्रवेश करू शकतात.

संग्रहित छायाचित्र

 

इंग्लंडमध्ये उदयास आलेली औद्योगिक क्रांती, दुसरे महायुद्ध या आणि एकूणच विकासात्मक प्रकल्पांमुळे नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर होऊ लागला, प्रदूषणाच्या समस्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्या. हळूहळू पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला. या काळात पर्यावरण प्रदूषण आणि याच्याशी निगडित अन्य समस्या या त्या त्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या जीवसृष्टीलाच हानिकारक ठरतात, असा सर्वसाधारण समज होता. परंतु हवेला राजकीय अथवा भौगोलिक सीमेची बंधने नसतात आणि त्यामुळे कोणत्याही देशातील कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे वायू हवेत मिसळून सीमापार अन्य कोणत्याही देशाच्या हद्दीत प्रवेश करू शकतात. १९६० च्या दशकात स्वीडनमध्ये होत असलेल्या आणि तेथील जलीय परिसंस्थेला घातक ठरत असलेल्या आम्लपर्जन्याला कारणीभूत असलेले प्रदूषक वायू सीमेपलीकडील देशांमधून हवेच्या माध्यमातून (ट्रान्सबाउंडरी मूव्हमेंट) स्वीडनच्या हवेत प्रवेश करत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर स्वीडन सरकारने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आपली व्यथा मांडली आणि जगातील सर्व राष्ट्रांनी एकाच मंचावर येऊन प्रदूषण व इतर पर्यावरणीय समस्यांवर विस्तृतपणे चर्चा करण्यासाठी एक जागतिक परिषद आयोजित करावी अशी विनंती केली.

परिणामी, स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम या शहरातच अशी परिषद भरवण्याचे निश्चित झाले. यासाठी १९७२ साली ५ जून ते १६ जून असे तब्बल दहा दिवस या परिषदेसाठी राखून ठेवण्यात आले. परिषदेत भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या. १४ जून रोजी त्यांनी या परिषदेत केलेले पर्यावरणविषयक भाषण इतके प्रभावी झाले की, सभागृहात उपस्थित स्वीडनचे तत्कालीन पंतप्रधान ओलोफ पाल्मे व इतर राष्ट्रांच्या प्रमुखांसह सर्व सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना अभिवादन केले. ‘संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून आजपावेतो झालेल्या भाषणांमध्ये सर्वात प्रभावी आणि अमोघ वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना’ अशी या भाषणाची नोंद आहे. ‘‘गरिबी, दारिद्रय़ हेच आमच्या दृष्टीने पर्यावरणाला घातक आहे. कारण रोजचे दोन वेळचे जेवण मिळण्याची ज्यांना भ्रांत आहे, त्यांना तुम्ही पर्यावरण रक्षण करा, नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करा वगैरे उपदेश करून काय उपयोग?’’ अशी मांडणी करत, त्यामुळे विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांना मदत करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विकसनशील राष्ट्रांना पर्यावरणविषयक धोरणे, कायदे, नियोजन करण्यासाठी योग्य दिशा देणारे आणि विकसित राष्ट्रांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ते ऐतिहासिक भाषण ठरले.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on stockholm council 1 2 abn

Next Story
मनोवेध : चवीची सजगता
फोटो गॅलरी