डॉ. मानसी राजाध्यक्ष
अठराव्या शतकाच्या अखेरीला मार्टिनस व्हान मरूम हा डच शास्त्रज्ञ विद्युतप्रवाहाद्वारे होणाऱ्या हवेच्या विघटनावर प्रयोग करत होता. विजेची ठिणगी पडत असताना एक वेगळाच वास येत असल्याचे त्याने जाणले. त्यानंतर इ.स. १८३९ मध्ये क्रिस्तियान शॉनबाइन हा स्विस-जर्मन संशोधक पाण्याच्या विद्युत अपघटनावर (इलेक्ट्रॉलिसिस) संशोधन करत होता. या वेळी त्यालाही धन इलेक्ट्रोडशी विशिष्ट वास येत असल्याचे जाणवले. हा वास विद्युत अपघटनामुळे निर्माण होणाऱ्या एखाद्या रासायनिक वायूचा असण्याची शक्यता त्याला वाटली. या आपल्या शोधावर सविस्तर संशोधन करून त्याचा अहवाल शॉनबाइन याने ‘ब्रिटिश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेकडे पाठवला. आपण शोधलेल्या या वायूला त्याने नाव दिले, ‘ओझोन’! ग्रीक भाषेत ‘ओझिन’ म्हणजे वास येणे. काही काळातच, हा वायू इतर रासायनिक क्रियांद्वारेही तयार करता येत असल्याचे दिसून आले. ओझोनचा शोध लागल्यानंतर, त्याचे रासायनिक सूत्र कळण्यासाठी मात्र त्यानंतरची पंचवीस वर्षे जावी लागली. ओझोनची निर्मिती कोणत्याही क्रियेद्वारे झाली असली तरी, या वायूचे गुणधर्म सारखेच होते. याचा अर्थ ते वायूंचे मिश्रण नव्हते. तसेच विजेच्या ठिणग्यांद्वारे निर्माण होणाऱ्या ओझोनच्या निर्मितीत फक्त ऑक्सिजनचाच सहभाग होता. यावरून ओझोन हा वायू ऑक्सिजनचाच प्रकार (अपरूप) असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर १८६५ साली जाक-लुई सोरे या स्विस संशोधकाने, ओझोनचा रेणू हा ऑक्सिजनच्या किती अणूंपासून तयार झाला आहे, हे शोधून काढण्यासाठी ओझोन आणि ऑक्सिजनचे मिश्रण घेतले. त्याचा काही भाग त्याने टर्पेटाइन तेलाच्या सान्निध्यात आणला. रासायनिक क्रियेमुळे या मिश्रणातील ओझोन टर्पेटाइनमध्ये शोषला जाऊन मिश्रणाचे आकारमान कमी झाले. यामुळे मिश्रणातील ओझोनचे आकारमान माहीत झाले. त्यानंतर सोरे याने ओझोन-ऑक्सिजन मिश्रणाचा आणखी एक भाग घेतला आणि तो तापवला. उष्णतेमुळे ओझोनचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर होऊन, या मिश्रणाचे आकारमान वाढले. यामुळे हा ओझोन किती ऑक्सिजनपासून निर्माण झाला हेसुद्धा समजले. या ऑक्सिजनच्या आणि त्यापासून निर्माण झालेल्या ओझोनच्या आकारमानांवरून गणिताद्वारे ओझोनच्या एका रेणूत ऑक्सिजनचे तीन अणू असल्याचे सिद्ध झाले. रासायनिकदृष्टय़ा अतिशय सक्रिय असणारा हा वायू त्यानंतर अल्पकाळातच विरंजन (ब्लीचिंग), र्निजतुकीकरण, अशा विविध कारणांसाठी वापरला जाऊ लागला.
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org