आपल्या मूलभूत गरजांपैकी अन्नाची गरज भागवण्यासाठी प्रत्यक्ष पाणी लागते. तर वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करताना अप्रत्यक्ष पाणी लागते. त्याचा मागोवा घेऊ या..

वस्त्रांचा विचार करायचा, तर कापसाच्या पिकासाठी लागणारे पाणी आणि कापड उद्योगासाठी आवश्यक असणारे पाणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे एक किलोग्रॅम कापूस पिकवण्यासाठी १०,००० लिटर पाण्याची गरज असते. तयार झालेला कापूस पुढे कापडगिरणीत आणला जातो. कापडगिरणीत सूतकताई, विणकाम या कामासाठी जास्त पाणी लागत नाही; परंतु धुलाई, विरंजन, रंगकाम, कापडावरील छपाई या रासायनिक प्रक्रियांसाठी भरपूर पाणी लागते. थोडक्यात, एक ‘टी शर्ट’ तयार होताना जवळपास २,५०० लिटर पाण्याची गरज असते. एका ‘जीन्स’ पॅण्टसाठी ८,००० लिटर पाणी लागते. जास्त पाणी लागणाऱ्या उद्योगांमध्ये जगात कापड उद्योगाचा तिसरा क्रमांक आहे. शिवाय या उद्योगात वापरल्या जाणाऱ्या फॉर्मेल्डीहाइड, क्लोरिन यांसारख्या रासायनिक पदार्थामुळे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे शुद्ध, स्वच्छ पाण्याच्या साठय़ावर त्याचा परिणाम होतो.

आपण परिधान करत असलेल्या वस्त्रांबरोबरच विविध प्रकारच्या पिशव्या, सतरंज्या, चादरी, पायपुसणी, गादीची आवरणे, हातरुमाल, टॉवेल, इत्यादी वस्तू कापड उद्योगात तयार होतात. म्हणजे आपण करत असलेल्या अप्रत्यक्ष पाणीवापरात या वस्तूंचा सामावेश केल्यावर अप्रत्यक्ष पाणीवापराची आकडेवारी वाढतच जाते. जगभरातील कापड उद्योजकांच्या लक्षात आता ही बाब आली आहे. कापड उद्योगात लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणखी कमी कसे करता येईल, यावर नवनवीन संशोधने सुरू आहेत.

पारंपरिक पद्धतीत सूत अथवा तंतूमय पदार्थ चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ करावे लागतात. यावर एक उपाय म्हणून जैविक पद्धतीने धागे स्वच्छ करण्याची प्रक्रिया आता काही ठिकाणी केली जाते. यामध्ये  पिकलेल्या फळांतील ‘पेक्टिनेज’ नावाचे एक प्रथिन वापरले जाते. यामुळे सूत अथवा तंतूमय पदार्थ स्वच्छ करण्यासाठी एकदाच पाणी वापरावे लागते आणि साहजिकच पाण्याची बचत होते. त्याचप्रमाणे रंगकामाच्या प्रक्रियेत सॉल्व्हंट डाइंग एन्झाइम्स, प्लाझ्मा डाइंग, एअर डाइंग आदी पद्धतींचा वापर केल्याने पाण्याची बचत होते. याखेरीज एक मार्ग म्हणजे वापरलेले पाणी पुन्हा शुद्ध करून वापरणे; तोही वस्त्रोद्योगाने काही प्रमाणात स्वीकारला आहे.

सुचेता भिडे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org