आज मुद्रणाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नव्या तंत्रसाधनांच्या आगमनामुळे तर मुद्रण जनसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. कार्यालयांतली कागदपत्रे असोत वा साहित्यपर वा इतर पुस्तके, मुद्रणसाधनांतील प्रगतीमुळे पूर्वीपेक्षा मुद्रणाचे प्रमाण नक्कीच वाढलेले दिसेल. आताशा डिजिटल माध्यमाचा प्रसार होऊ लागला असला तरी मुद्रण हेच अजूनही अनेकांना सोयीचे आहे. उदाहरणार्थ, बँका आणि इतर खासगी कार्यालये. या ठिकाणी व्यवहारांत मुद्रणाचे महत्त्व मोठे आहे. जितके कर्मचारी तेवढे संगणक आणि जवळ जवळ तितक्याच संख्येने छपाईयंत्रे म्हणजे प्रिंटर्स, असे चित्र दिसते. प्रत्येक व्यवहार हा आधी संगणकावर आणि नंतर लगेचच छापलेल्या कागदावर!

मुद्रण म्हणजे छपाई. कागदावर काही ठसा उमटविणे, असा या क्रियेचा ढोबळ अर्थ. शब्द वा चित्रांच्या एकाच नमुन्याच्या ठसा असलेल्या अनेक प्रती तयार करणे म्हणजे मुद्रण, असेही आपल्याला म्हणता येईल. गेल्या शतकभरात तर मुद्रण प्रक्रियेत अनेक बदल झाले आणि त्याने मुद्रण करणे अधिक सुसह्य़ झालेले दिसते.

शाळा-महाविद्यालयांत शिकणारी आजची पिढी जणू हाताने लिहिणेच विसरू लागली आहे की काय, असे वाटावे इतकी ही पिढी मुद्रण अर्थात छापील माध्यमावर विसंबून आहे. परीक्षेत तीन तास पेनाने उत्तरपत्रिका लिहिणे, हे त्यांना कंटाळवाणे वाटू लागले आहे. ‘प्रोजेक्ट’ अथवा माहिती संकलनात संगणकाला विचारल्यानंतर पडद्यावर उमटलेली माहिती छापील स्वरूपातच एकत्र केली जाते. अशी माहिती पुस्तकातून असेल तर त्या पानांच्या छायांकित प्रती काढल्या जातात. टिपणे लिहिणे तर आता कालबाह्य़ झाले आहे. छपाईच्या सोप्या पद्धती आणि मोबाइलमधील टंकनाच्या सुलभ सोयींमुळे अगदी संभाषणही बोलण्याऐवजी ‘टाईप’ केले जात आहे. म्हणजे आता हाताने लिहिण्याशिवाय कोणत्याही पद्धतीने अक्षरे लिहिणे हे मुद्रणच आहे.

मात्र हे सर्व छपाईचे तंत्र अधिकाधिक प्रदूषणकारी होत आहे. उदाहरणार्थ, संगणकाच्या अथवा मोबाइलच्या वापरातून तसेच ई-प्रिंटर्समधून होणारे ई-प्रदूषण; छपाई यंत्राच्या प्रिंटिंग कॉइलमधून होणारे गंभीर सूक्ष्मकणांचे रासायनिक प्रदूषण; लाखो प्रती क्षणात छापणाऱ्या राक्षसी छपाई यंत्रातून निर्माण होणारा कचरा, इत्यादी.

हे पाहता, किमान आपण आपल्यापुरते तरी मुद्रण कमी करू शकतो का, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आवश्यकता नसताना प्रिंटरवर कोणतीही छपाई करायची नाही, आपल्या हाताने लिहिण्याची क्षमता उपयोगात आणायची, इत्यादी. या गोष्टी आजच्या जागतिक मुद्रणदिनी मनावर मुद्रित करू या!

– विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२