काल जागतिक महिला दिन साजरा झाला. जसे आपण हा दिवस साजरा करतो, तसेच प्राणीसुद्धा करत असतील का, असा विचार मनात येऊन गेला. एखादी सिंहीण आपल्यासाठी काय काय करते, असा विचार सिंहाने कधी केला असेल का? ‘आई कुठे काय करते..’ असा विचार एखाद्या वाघिणीचा बछडा करत असेल का?
प्राण्यांमध्ये नर आणि मादी यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. आशिया आणि आफ्रिकेतील मादी सिंह आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असते. तिने केलेली शिकार संपूर्ण कुटुंबासाठी असते. काही वेळा तर मादी आपण केलेली शिकार नराला देतसुद्धा नाही.. ऑक्टोपस, जायंट वूड स्पायडर, प्रार्थना कीटक या प्रजातींतील माद्या मथुनानंतर नरांना गिळंकृत करतात.. मधमाश्यांमध्ये तर नरांचा जन्म हा केवळ आपला वंश पुढे नेण्यासाठी झालेला असतो. पोळ्याची प्रमुख राणी माशी असते. तिची काळजी घ्यायला कामकरी माश्या असतात. नराचे काम फक्त पुनर्निर्मितीचे.. डासांमध्ये आपल्याला चावणारी मादीच असते; कारण नर डास केवळ फुलांच्या रसावर जगतो. मादीला अंडी तयार करताना काही प्रथिनांची आवश्यकता असते, जी रक्तामधून मिळतात.. स्पॉटेड हाएना किंवा ठिपकेदार तरस या प्राण्याची मादीदेखील अतिशय कणखर आणि संपूर्ण चमूची जबाबदारी सांभाळणारी असते. यांच्या चमूमध्ये जवळपास १०० तरस असतात.. आपल्यापैकी बहुतांश जणांचा लाडका प्राणी हत्ती. आशिया आणि आफ्रिकेतील हत्ती प्रजातींमध्ये हत्तिणीला जास्त महत्त्व आहे. त्यांच्याही चमूचे नेतृत्व हत्तीण करते. जेव्हा नर हत्ती वयात येतो, तेव्हा तो चमू सोडून एकटा राहतो; परंतु त्याच्या कुटुंबाला हत्तीण सांभाळते.. प्राण्यांप्रमाणेच बहुतांश शिकारी पक्ष्यांच्या माद्या नरांपेक्षा आकाराने मोठय़ा तसेच बळकट असतात.. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मनुष्यप्राणीदेखील याच निसर्गाचा एक घटक आहे. मात्र, काळाच्या ओघात आपण निसर्गापासून दूर होत आलो आहोत. त्यामुळेच प्राणी प्रजातींमधील मादीला निसर्गात एवढे महत्त्व असताना, फक्त मनुष्यप्राणी प्रजातीमध्ये तिला कमी लेखले जाते. तिला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडावे लागते. आपल्याला महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी महिला दिन साजरा करावा लागतो. हे योग्य आहे का? थोडा विचार करून पाहा.
– सुरभि वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org