इमारतींवर उंच जागी, मॉलमध्ये तसेच दुकानांवर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रंगीत प्रकाशाने चमकत असलेल्या जाहिराती आपल्याला  ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. हे एक प्रकारचे विद्युत दिवेच आहेत. सुरुवातीला निऑन वायू वापरून ह्य़ा जाहिराती बनवल्या जात असत, म्हणून या दिव्यांना ‘निऑनचे दिवे’ किंवा ‘निऑन साइन्स’ म्हणूनही ओळखलं जातं. ‘निऑन’ हे एक निष्क्रिय मूलद्रव्यं असून हवेत अल्प (०.००१८ टक्के) प्रमाणात आढळतं. हवेचे अंशात्मक ऊध्र्वपातन करून निऑन वायू मिळवतात. या वायूचा द्रवणांक उणे २४६ अंश सेल्सिअस आहे. जर हवा उणे २०० अंश सेल्सिअसला गोठवली तर निऑन हा वायू अवस्थेत शिल्लक राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिसमध्ये १९१० मध्ये जॉर्ज क्लाऊड याने निऑन वायू वापरून प्रथम दिवा बनवला आणि नंतर त्याचं एकस्वही मिळवलं. आता निऑनबरोबर हेलिअम, अरगॉन इत्यादी वायू मिसळून, रंगीत नळ्या वापरून वा दोन्ही गोष्टी करून इतर रंगांचा प्रकाश मिळविता येतो. या दिव्यांची नळी अगदी अरुंद असून ती दोन मीटपर्यंत लांब असू शकते. या नळीला वळवून निरनिराळ्या अक्षरांचे व आकृतींचे आकार देता येतात.

प्रश्न पडतो की, निऑन हे मूलद्रव्य निष्क्रिय आहे, मग यातून रंगीत प्रकाश कसा काय मिळतो? सामान्यपणे कमी दाब असलेला निऑन वायू काचेच्या नळीत भरून दोन विद्युत अग्रे बंदिस्त करून हे दिवे तयार करतात. उच्च विद्युत दाबामुळे निऑन वायूच्या अणूमधील बाह्य़तम कक्षेतील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून घेतात आणि ते उच्च ऊर्जा पातळी गाठतात; पण तिथे ते स्थिर होऊ शकत नाहीत. पुन्हा ते आधीच्या ऊर्जा पातळीवर येतात; पण आधीच्या ऊर्जा पातळीवर येताना ते शोषून घेतलेली ऊर्जा उत्सर्जति करतात. उत्सर्जति ऊर्जा पातळीनुसार रंगीत प्रकाश दिसू लागतो. त्यामुळे संपूर्ण दिवा किंवा नळी प्रकाशाने उजळून निघते.

द्रवीभूत निऑन शीतक म्हणूनही वापरतात. याची शीतक क्षमता ही द्रवीभूत हेलिअमच्या ४० पट जास्त आहे. शिवाय निऑनचा वापर हेलिअमसोबत बारकोड डिटेक्टरच्या लेसरमध्येही करतात. निऑन वायू हा कोणत्याही जैविक प्रक्रियेत भाग घेत नाही. शिवाय हा वायू पर्यावरणीय आणि जैविकदृष्टय़ा अपायकारक असल्याचे अभ्यासकांना आढळलेले नाही.

– शुभदा वक्टे, मुंबई

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on neon lighting