आपल्या सभोवती असणाऱ्या असंख्य जैव (बायोटिक) व अजैव (एबायोटिक) घटकांच्या आंतरक्रिया व सुसंवाद यांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो. निसर्गातील प्रत्येक अधिवासात (हॅबिटाट) परस्परावलंबी जिवाणू, वानसे/ वनस्पती व प्राणी यांनी बनलेला जीव समुदाय (बायोटिक कम्युनिटी) असतो. अजैव घटकांशी मेळ साधत हा जीवसमुदाय, परिसंस्था (इकोसिस्टिम) बनतो. पृथ्वीवरील सर्व परिसंस्थांना एकत्रितपणे जीवावरण (बायोस्फिअर) संबोधतात. या जीवावरणाचे तीन प्रभाग म्हणजे वातावरण (अ‍ॅटमॉस्फिअर), जलावरण (हायड्रोस्फिअर) व शीलावरण (लिथोस्फिअर).

वातावरणाचे तपावरण (ट्रोपोस्फिअर), स्थिरावरण (स्ट्रॅटोस्फिअर), मध्यावरण (मेसोस्फिअर),  ऊष्मावरण/ अयनावरण (थर्मोस्फिअर/ आयनोस्फिअर) व बहिरावरण (एग्झोस्फिअर) असे स्तर असतात. यांपैकी भूपृष्ठापासून वरच्या दिशेला सात ते दहा किलोमीटर पसरलेले तपावरण बहुतांश जीवसृष्टीला आश्रय देते. जलावरणाचे मुख्य दोन उप-प्रभाग महासागर व भूवेष्टित जलाशय असून यातील दुसऱ्याचे प्रवाही व अप्रवाही असे प्रकार पडतात. प्रवाही जलाशयांत निर्झर, ओढे, नाले, नद्या, खाडय़ा यांसारखे, तर अप्रवाही जलाशयात तळी, सरोवरे, डबकी, कुंड असे जलाशय असतात. शिलावरण हा पृथ्वीगोलाचा सर्वात बाहेरचा थर असून त्याखाली दुर्बलावरण (अ‍ॅस्थिनोस्फिअर), मध्यावरण आणि बाह्य तसेच अंतर्गर्भ (आउटर अँड इनर कोअर) असतात. केवळ शिलावरण जीवसृष्टीस आधार देते.

सजीव अत्यंत चिवट व अनुकूलनक्षम (अ‍ॅडॅप्टेबल) असल्याने पराकोटीच्या विपरीत परिस्थितीतही आढळतात. शतकानुशतके थिजलेल्या हिमनगांपासून, उत्कलनिबदूसमीप तापमानाच्या उष्ण फवाऱ्यांपर्यंत, अत्यंत कमी क्षारतेच्या निर्झरापासून मिठागरांच्या कमाल क्षारतेच्या पाण्यापर्यंत, आत्यंतिक आम्लधर्मी ते आत्यंतिक अल्कधर्मी अधस्तरांपर्यंत व प्राणवायूच्या सान्निध्यापासून त्याच्या पूर्ण अभावापर्यंतच्या परिस्थितीत जीवसृष्टी आढळते. मुख्य अधिवासात अनेक सूक्ष्म अधिवास (मायक्रो- हॅबिटाट्स) असून त्यांत भिन्न जीव-समुदाय वास करतात.

जीव समुदायांत तुलनेने अलीकडेच उदयास आलेल्या मानव प्रजातीने निसर्गाला अनिर्बंध लुटले आहे. निसर्ग आता याचा बदला घेण्याच्या स्थितीत असून नैसर्गिक आपत्ती वरचेवर व अधिकाधिक प्रभावाने कोसळू लागल्या आहेत. म्हणूनच तातडीने निसर्ग संवर्धन व संरक्षणाची कृती प्रत्येक माणसाने, उद्योग-व्यवसायाने, स्थानिक स्वराज्य संस्थेने, देशाने व खंडाने करणे अत्यावश्यक झाले आहे.

– डॉ. पुरुषोत्तम काळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org