झाडे जमिनीत मुळे रोवून एकाच ठिकाणी उभी असतात; पण या झाडांचा प्रसार पक्षी, कीटक, भुंगे या अनेकांमार्फत होतो. फुलपाखरू हेदेखील त्यांपैकी एक. फुलपाखरे फुलांवरील मकरंद गोळा करण्याच्या उद्देशाने अनेक झाडांना भेटी देत असतात. त्या वेळी त्यांच्या पंखांना, शरीराला चिकटलेल्या परागकणांचा इतर फुलांतील बीजांडांशी मेळ होतो. यालाच परागीभवन म्हणतात. मात्र, पर्यावरण संवर्धन आणि अन्नसाखळीत फुलपाखरे याहूनही जास्त निर्णायक भूमिका बजावीत असतात. फुलपाखरांची अंडी हे कित्येक कीटकांचे प्रथिनयुक्त अन्न, तर फुलपाखरांच्या अळ्या या काही पक्ष्यांना विशेष प्रिय! काही मुंग्यादेखील रेडस्पॉट, सिल्व्हर लाइन इत्यादी फुलपाखरांच्या अळ्यांमार्फत बाहेर पडणाऱ्या मधुरसावर जगतात. तर पूर्ण वाढ झालेली फुलपाखरे ही जाळे विणलेल्या कोळ्यांचे किंवा सरडय़ांचे मुख्य अन्न. राजा, नवाब यांसारख्या फुलपाखरांना तर माणसांचे, प्राण्यांचे मलमूत्रदेखील विशेष प्रिय. फुलपाखरांच्या अळ्यांमार्फत बाहेर पडणारी विष्ठा हेदेखील एक उच्च दर्जाचे नैसर्गिक खत असते.
दुसरे म्हणजे फुलपाखरांचा वावर. ज्याप्रमाणे घनदाट जंगल व जैवविविधतेने संपन्न असलेल्या प्रदेशात भरपूर पक्षी वास्तव्यास असतात; त्याचप्रमाणे विविध प्रजातींची फुलपाखरे एखाद्या ठिकाणी असणे हे त्या ठिकाणच्या खाद्य वनस्पतींच्या विपुलतेचे द्योतक ठरते.
फुलपाखरांचा विहार म्हणजे लय व गती यांचा विलोभनीय असा संगम. भरजरी नक्षीकाम आणि लोभस रंगसंगती लाभलेल्या पंखांनी ही फुलपाखरे चित्तवेधक ठरतात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बागडणारी अथवा एकमेकांचा पाठलाग करत असलेली फुलपाखरे न्याहाळणे ही एक प्रकारची सौंदर्यानुभूतीच! विविध कलाविष्कारांतून मानवी मनाला जशी अनुभूती मिळते, तसाच काहीसा हा प्रकार! त्यामुळे तणावग्रस्त मानवी मन हे फुलपाखरांच्या सान्निध्यात सकारात्मक कार्य करू शकते, असे वाटते. मानसिक व्याधींवर उपाय म्हणून निसर्गोपचारांत फुलपाखरांच्या सहवासाचा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे?
नवी मुंबईतील ऐरोली येथील ‘नॅशनल बर्न्स सेंटर’ या इस्पितळात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करताना, या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी तिथल्या मोकळ्या आवारात चक्क एक फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आले आहे!
दिवाकर ठोंबरे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org