आपल्या परिसरात तलाव आहे? की नदी आहे? अथवा अगदी वर्षभर वाहणारा नाला आहे? आपण सुदैवी असू तर, आपल्या परिसरात समुद्र किनारा किंवा आनंददायी खाडी किनारा असेल, तर त्या सर्व पाण्याच्या ठिकाणच्या भोवती ओलसर चिखलाने व्यापलेली, विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वाढलेली सर्व जागा म्हणजे ‘वेटलँड’! आजही ही वेटलँड प्रचलित भाषेत ‘वेस्ट’लँड म्हणून ओळखली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या जागेवर कचऱ्याचे ढीग आणि झोपडपट्टी हटकून आढळते. याचे मूळ कारण म्हणजे आपण या जागेकडे कधीही फिरकत नाही. जर या जागेवर आपण कचरा टाकला नाही, तर नसर्गिकरीत्या ती जागा सुंदरच दिसते. विविध प्रकारच्या वनस्पती, फुलपाखरे आणि विशेषत: विविध प्रकारचे पक्षी या जागेवर निश्चितपणे आढळतात. खरे तर आपल्या शहरातील सिमेंटच्या जंगलातून निसर्गात डोकावण्यासाठी या जागांचा उपयोग होतो.

आपण या जागांना वारंवार भेट दिल्यास त्यावर अतिक्रमण न होता त्या जागा मोकळ्या राहतील. त्या जागांवरील जैवविविधताही सहज बघता येणारी आहे. ती न्याहाळताच या जागेचे महत्त्व आणि सौंदर्य ध्यानात येईल. मग त्यावर कोणताही कचरा करण्यास किंवा अतिक्रमण करण्यास सहसा कोणीही धजावणार नाही. त्यासाठीच ‘पर्यावरण दक्षता मंडळा’ने गेली १४ वष्रे ‘स्वच्छ खाडी अभियान’ चालवले आहे.

स्वच्छ खाडी अभियानात गेली १४ वष्रे विविध महाविद्यालयांत ‘वेटलँड डे कॉन्फरन्स’चे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने त्या परिसरातील विद्यार्थी कुतूहलाने त्यांच्या जवळच्या खाडी परिसराला भेट देतात आणि त्यांची निरीक्षणे या परिषदेत नोंदवतात.

डॉ. कोदारकर या संशोधकाच्या स्मृतीनिमित्त व्याख्यान आयोजित केले जाते. ‘असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस’चे प्राध्यापक, संशोधक या परिषदेत सहभागी होतात. या क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांमधून याविषयी मार्गदर्शन मिळते.

यावरून काहींचा समज असा होईल की, खाडीत आत उतरून ती स्वच्छ ठेवण्याचे हे अभियान आहे. तर तसे नव्हे; इथे दृष्टिकोन निराळा आहे. ‘ही खाडी आपली आहे’ हे ध्यानात घेऊन तिच्यात कचरा न टाकण्याचे आणि खाडी स्वच्छ ठेवण्याचे हे अभियान आहे. तर.. १ फेब्रुवारीला मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात ‘वेटलँड डे कॉन्फरन्स’मध्ये उपस्थित राहून ‘स्वच्छ खाडी अभियाना’त सक्रिय सहभाग नोंदवा!

– विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean creek campaign zws