डॉ. श्रुती पानसे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या आसपास अनेक माणसं असतात. प्रत्येकाचं डोकं वेगळं चालतं. याचं कारण प्रत्येकाला मिळणारे अनुभव वेगळे असतात. त्या अनुभवांना प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असते. कोणते अनुभव नुसतेच साठवायचे, कोणते प्रक्रिया करून साठवायचे, हे निर्णय मेंदू घेत असतो. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असू शकत नाही. सख्खी किंवा जुळी भावंडंसुद्धा एकसारख्या पद्धतीने विचार करत नाहीत. पालक आणि मुलांमधल्या बुद्धिमत्तांचे पलू वेगळे असू शकतात.

सर्व माणसं एका मुशीतून घडल्यासारखी नाहीत, वेगळी आहेत. त्यांच्यात स्वतंत्र विचारक्षमता आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. त्याला पडलेले पलू वेगळे आहेत, हीच विविधता आहे. या विविधतेत सौंदर्य आहे. या बुद्धिसौंदर्याची जोपासना करायला हवी. येत्या काही भागांमध्ये माणसांमध्ये असलेल्या विविध बुद्धिमत्तांविषयी जाणून घेऊ. सुरुवात करू गणिती बुद्धिमत्तेपासून. शास्त्रज्ञ, संशोधकांच्या मेंदूमध्ये जन्मजातच गणिती बुद्धिमत्ता असते. घरात कोणीही शास्त्रज्ञ नसताना डॉ. कलाम शास्त्रज्ञ झाले नसते. शकुंतलादेवी गणितज्ञ झाल्या नसत्या. दोघांच्याही घरची माणसं रूढार्थाने शिकलेली नव्हती. डॉ. कलाम यांच्या वडिलांचा नावा चालवण्याचा व्यवसाय होता. तासन्तास हा छोटा मुलगा वडिलांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर असायचा. लांबवरच्या देशातून येणाऱ्या सीगल पक्ष्यांबद्दल त्यांना खूपच कुतूहल होतं. त्यामुळेच वैमानिक व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. पुढे त्यांनी आकाश नव्हे; तर अवकाशाच्या संदर्भात काम केलं.शकुंतलादेवी यांच्या वडिलांची सर्कस होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी शकुंतलादेवींमधली गणिती बुद्धिमत्ता लक्षात आली तेव्हा त्यांनी मुलीला घेऊन रस्त्यावर ‘गणिताचे शो’ केले. म्हैसूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांना तिच्यातली गणिती बुद्धिमत्ता लक्षात आली. पहिल्या भारतीय स्त्री शास्त्रज्ञ म्हणून कमला सोहोनी यांचं नाव घेतलं जातं. विज्ञान हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय. शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी आवश्यक परीक्षा त्यांनी  दिल्या. पण  ‘इन्स्टिटय़ूटमध्ये एकही स्त्री नाही’, या कारणासाठी प्रवेश नाकारला गेला, तेव्हा  त्यांनी सत्याग्रह केला.

गणिताचा संबंध पोस्टेरिअर पेरिएटल कॉर्टेक्स, व्हेण्ट्रोटेम्पोरल ऑसिपिटल कॉर्टेक्स व प्री फ्रंटल कॉर्टेक्स या न्यूरॉन्स-जाळ्यांशी असतो. तर्काचा जास्त वापर करणारे, कोडी सोडवणारे, अशा अनेकांकडे गणिती बुद्धिमत्तेचा भाग जास्त असतो.

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr shruti panse article on brain