डॉ. रोहिणी कुळकर्णी
निसर्गात सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे विषाणू असतात. प्राणीपेशीवर वाढणारे विषाणू, वनस्पतीपेशीवर वाढणारे विषाणू आणि जिवाणूवर वाढणारे विषाणू. जिवाणूच्या पेशीत वाढणाऱ्या विषाणूला ‘बॅक्टेरिओफाज’ असे म्हणतात. विषाणू या सूक्ष्मजीवांचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ते जिवंत पेशीमध्ये वाढतात. एखाद्या द्रवात जिवाणूवर वाढणारे विषाणू किती प्रमाणात आहेत, त्यांची संख्या किती आहे; हे मोजण्यासाठी प्लाक्सची पद्धती वापरली जाते. फेलिक्स डी हेरेले या फ्रेंच मायक्रोबायोलॉजिस्टने बॅक्टेरिओफाज (जिवाणूला खाणारा विषाणू) या विषाणूंचा शोध लावला. जर जिवाणू असलेल्या पोषणमाध्यमावर विषाणू टाकले तर हे विषाणू मोजक्याच जिवाणूंना मारतात व मोजकेच आणि संख्येने विरळ असे पारदर्शक भाग स्पष्ट दिसू शकतात. असे पारदर्शक भाग मोजून त्याला सौम्य करणाऱ्या घटकाने (डायल्युशन फॅक्टर) गुणले तर मूळ द्रावणात किती विषाणू होते हे मोजता येते.
१९१८ ते १९२१ च्या दरम्यान फेलिक्स डी हेरेले यांनी अनेक प्रकारचे ‘बॅक्टेरिओफाज’ शोधून काढले. व्हिब्रिओ कॉलरा या बॅक्टेरियाला खाणाऱ्या विषाणूचादेखील शोध लावला. हे कॉलरा आणि टायफॉइड यासाठी रोगोपचार पद्धती म्हणून वापरले जावे, असा दावा त्यांनी केला होता. पण पुढे पेनिसिलीनच्या शोधांनंतर त्यांचा दावा मागे पडला. १९७०च्या दशकात प्रतिजैविकांना रोगजंतू विरोध दर्शवू लागल्याचे लक्षात आले आणि पुन्हा गंभीर आजारांसाठी ‘बॅक्टेरिओफाज’ थेरपीचाच वापर करावा असा विचार पुढे आला.
उदाहरणादाखल ‘टी २ कोलायफाजचे’ प्रमाण सांडपाण्यात भरपूर असते. अशा सांडपाण्यातील विषाणूच्या ‘न’ संख्येचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट पद्धती वापरतात. ‘इश्चेरीशिया कोलाय बी’ या जिवाणूच्या पेशीत ‘टी २ कोलाय फाज’ हा विषाणू वाढतो. यासाठी ट्रिप्टोन या पोषणमाध्यमाचा वापर केला जातो. प्रथम ‘इश्चेरीशिया कोलाय बी’ हा जिवाणू आणि ‘टी २ कोलाय फाज’ हा विषाणू निर्जंतुक ट्रिप्टोन माध्यमात एकत्रित करून आणि त्यांचे मिश्रण झाकण असलेल्या काचेच्या बशीत (पेट्रीप्लेट) समप्रमाणात ओततात.
पेट्रीप्लेट ३७ अंश सेल्सिअस तापमानाला २४ तास उबवल्यानंतर घट्ट ट्रिप्टोन आगार प्लेटवर ‘इश्चेरीशिया कोलाय बी’ या जिवाणूंची वाढ झालेली दिसते; परंतु मध्येच पारदर्शक गोलाकार विभाग दिसतात. ज्या ‘इश्चेरीशिया कोलाय बी’ पेशींमध्ये ‘टी-२ कोलाय फाज’चे प्रजनन होते त्या ‘बी’ पेशी मारतात आणि त्यामुळे हे पारदर्शक गोलाकार विभाग तयार होतात. यांनाच प्लाक्स असे म्हणतात. एक प्लाक म्हणजे एक विषाणू असे मोजले जाते. यांना प्लाक फॉर्मिंग युनिट्स (पी.एफ.यू.) असे म्हणतात.
– डॉ. रोहिणी कुळकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org