नारायण वाडदेकर
आपण खाल्लेल्या अन्नाचा काही भाग पचतो, शोषला जातो. जो भाग पचू शकत नाही, पचत नाही, तो वेळोवेळी आतड्याबाहेर टाकला जातो, त्याला विष्ठा म्हणतात. विष्ठेमध्ये अन्नमार्गातील थराच्या रोज मरणाऱ्या कोट्यवधी पेशी असतात. तोंडापासून गुदद्वारापर्यंत साधारण ८ ते १० मीटर लांबीच्या अन्नमार्गात असंख्य निवासी जिवाणू – एन्टीरोबॅक्टिरिया, क्लॉस्ट्रिडियम, ई.कोलाय, स्टॅफायलोकॉकाय, बायफिडोबॅक्टिरिया, लॅक्टोबॅक्टिरिया अशा प्रजाती असतात. अन्नमार्गातील अन्नप्रवासात अन्नपचन, शोषण आणि विष्ठेची बांधणी या सगळ्या प्रक्रियांत, अन्नमार्गातील निवासी जिवाणू मदत करतात. ते विकरे निर्माण करतात व अन्न पचवतात. शोषणात साहाय्य करतात. त्यांच्या वसाहती गालिच्यांच्या रूपात परस्पर संपर्कात असतात. या सूक्ष्मजीव वसाहतींमध्ये विविध जिवाणू, विषाणू, कवकजाती एकमेकांना साह्य करून, दुर्लक्षून वा क्वचित संघर्ष करून जगतात.
मानवी जीवनाच्या सुरुवातीला, गर्भाशयातल्या भ्रूणाच्या अन्नमार्गात जिवाणू नसतात. जन्मण्यापूर्वी बाळे क्वचित गर्भाशयातच मलविसर्जन करतात. त्यांची विष्ठा हिरवट-काळ्या रंगाची आणि चिकट असते. त्यांच्या विष्ठेत मुख्यत: अन्नमार्गातील मृत पेशी, यकृतनिर्मित पित्तरस आणि श्वसनमार्गातील, अन्नमार्गातील शेंबूड हे पदार्थ असतात.
बाळ प्रसूतीने बाहेर येऊ शकते किंवा सिझेरियन शल्यक्रियेने! जननमार्ग प्रसूतीत सूक्ष्मजीव बाळाच्या त्वचेवर येतात, नाकात, घशात शिरतात. आईचे दूध पिताना तोंडात, घशात, आतड्यात येतात. सिझेरियन बाळांत थोडे वेगळे जिवाणूप्रकार प्रवेशतात. एवढेच काय तर आईचे दूध पिणारी बाळे आणि पावडरीचे दूध पिणारी बाळे यांच्या शरीराबाहेर पडणाऱ्या ‘विष्ठे’चा रंग, घनता, बांधणी, वास इ. जिवाणू प्रकारांवर ठरते. बायफिडोबॅक्टिरियम ही एकच जिवाणूप्रजाती आईचे दूध पिणारी बाळे आणि पावडरीचे दूध पिणारी बाळे या दोन्ही गटांत असते. शिवाय दोन्ही गटांत बायफिडोबॅक्टिरियम संख्या-घनतेतही समान असतात.
शरीराबाहेर पडलेल्या विष्ठेतही अनेक भिन्न जिवाणूप्रकार असतात. उदा. स्ट्रेप्टोमायसिस, डायसल्फोबॅक्टिरेल्स, नायट्रोस्पिरा. त्यातील काही म्युसिन हे शेंबडातील प्रथिन व इतर प्रथिने पचवतात. अन्य काही मेद वा कर्बोदके पचवतात. पचणे म्हणजे रचना मोडणे आणि शेवटी विष्ठेपासून माती, खत बनणे.
अन्नाचे शोषण आणि पचन करणारे सूक्ष्मजीव ही एक परिसंस्था असते. आधुनिक युगात जंतुसंसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर वाढला आहे. या प्रतिजैविकांच्या सेवनामुळे रोगजंतूंचा नायनाट होत असताना अन्नमार्गातील उपकारक जंतूंचाही नायनाट होऊ लागला आहे. याला पर्याय म्हणून ‘प्रोबायोटिक्स’चे सेवन करावे, म्हणजे आपल्या आतड्यामध्ये चांगल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते आणि पचन सुधारते.
नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org