‘बोके, जरा इकडे कान कर, तुला काहीतरी सांगायचंय, थोडं सिरियस आहे, म्हणजे सिरियसली घेण्यासारखं आहे. ऐक.’ कुकूर बोकीच्या कानाला लागून म्हणाला. बोकीने ‘आय अॅम इन नो मूड टु लिसन’ असा लुक कुकूरला दिला. कुकूरनं दाद दिली नाही. तुला नाही वाटत अलीकडे हा जरा सिरियस झालाय. थोडा उदास असतो, स्वत:मध्ये मग्न राहतो. ‘सॅड’ आहे असं वाटतं.’ बोकीने खाडकन डोळे उघडून, कान ताठ करून माझ्याकडे पाहिलं. एरवी डोळ्याला डोळा न देणारी बोकी टक लावून माझ्याकडे पाहू लागली. दुपारच्या वेळी उष्ण हवा आली की डुलकी लागते. कुकूरच्या हुंकरानं मी जागा होऊन कुकूर नि बोकीच्या गप्पा ऐकत होतो.
बोकी कुकूरकडे बघून म्हणाली, ‘वाटतोय गं बाई, जरा नव्र्हस. बघ कसा स्वस्थ बसलाय नेहमी, वाचत असतो नाही तर लिहीत असतो.’ दोघांनी मग माझ्या डोळ्याला डोळा दिला.
‘एकटं वाटतंय गं त्याला. त्याला ना एकटेपणा नाही आवडत. आपण असताना त्याला का एकटं वाटावं? कुकूरनं बोकीला विचारलं. कुकूर, तुला ना डोकं कमीच आहे. यू ऑल्वेज थिंक फ्रॉम युअर हार्ट. अरे, आपण सगळे एकटे असतो. एकटे राहात नसलो तरी एकटेच जगतो. मोस्ट ऑफ द टाइम्स, आपण कामात असल्यानं. आपला एकटेपणा आपल्याला जाणवत नाही की त्रास देत नाही. एखाद्या कारणानं एकटेपणा जाणवला की आपण एकाकी होतो. वर्षभर मित्राबरोबर सदैव बडबडत असायचा, आता ती थांबणार म्हणून तो जरा गप्प गप्प असेल. कळलं ना? बोकी म्हणाली.
ती डोकॅलिटी मला नाही कळत. वाँट टु बी विथ हिम.. तू पण जरा बोल ना त्याच्याशी. वी आर हिज खरेखुरे मित्र. कुकूर माझ्या पायाला चिकटून म्हणाला. बोकीनं जांभई दिली, हातपाय लांब करून टुणदिशी उडी मारून मांडीवर आली. ‘बघ, तू नुसतं प्रेमानं जवळ बसतोस. मला त्याच्या डोक्यातले विचार कळतात. बोकी कुकूरला म्हणाली. कुकूरकडे त्यावर उत्तर नव्हतं.’
थोडय़ा वेळानं बोकी म्हणाली, यू नो, कुकूर, संवेदनशील असणाऱ्या माणसांना सर्वात आधी स्वत:ला मॅनेज करावं लागतं. ते जमतंय त्याला. बट् देअर आर सच मोमेंट्स्.. ‘तू आणखी काहीतरी सुचव ना त्याला!’ कुकूर म्हणाला. बोकीनं कान हलवून नाही म्हटलं. कुकूरसारखं काही काम करीत राहिलं, स्वत:ला बिझी ठेवलं तर एकटेपणा सुसह्य होतो, हे खरंय पण, एव्हरी वन मस्ट लर्न टु लीव्ह अलोन! मी शिकलीय बाई एकटं एकटं जगायला. माझ्या मांडीवरून उतरून बोकी म्हणाली, ‘कुकूर जगण्यातली गंमत अनुभवायची असेल तर बुद्धी आणि मन यांचा समतोल राखायला शिकावं लागतं. माणसं स्वत:ची प्रौढी मिरवतात, नाहीतर स्वत:ची अवस्था दयेस पात्र आहे अशा भ्रमात राहातात. आत्मप्रौढी किंवा आत्मकरुणा दोन्ही वाईट. आत्मभान हवं. जगण्याचा आनंद हवा. बेधुंदी नको, तर्कनिष्ठ हवी, पण तर्कटीपणा नको.. कुकूरला झोप लागत्येय असं वाटल्यानं, बोकीनं त्याला जागं केलं. चल आपल्या घरी जाऊ.. दोघं माझ्याकडे पाहून हसले आणि माझ्या मनात गायब झाले.. आता कुकूर, बोकी (तिची छकुली, बकुली आणि शकुली) हे सगळे माझ्या मनात सुखाने नांदताहेत!
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
कुतूहल : प्राण्यांची सुरक्षितता
प्राणी पाहणाऱ्यातील काही लोक, विशेषत: मुले हातात छोटे, मोठे दगड घेऊन ते िपजऱ्यातील प्राण्यांना मारण्यात मश्गूल होतात व त्यामुळे त्या प्राण्याला होणाऱ्या वेदना पाहून स्वत:ची करमणूक करून घेतात. ही करमणूक फार हीन दर्जाची आहे. यात त्या प्राण्यांना जखमा होत असतात, कारण तो दगड किती लहान किंवा किती मोठा असेल त्यावर, तो किती सपाट आहे किंवा अणकुचीदार असेल त्यावर आणि तो किती वेगाने येऊन प्राण्यांवर बसेल त्यावर होणाऱ्या जखमेचे स्वरूप अवलंबून असते. या प्रत्येक वेळी तेथे प्राणी संग्रहालयाचा माणूस त्या प्राण्यांना होणाऱ्या जखमांवर औषधपाणी करायला हजर नसल्याने त्या जखमा तशाच अंगावर बाळगण्यावाचून त्या प्राण्यांना इलाज नसतो. जर तो प्राणी तरुण असेल तर त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि मग अशा जखमा आपोआप बऱ्या होतात, पण जर तो प्राणी म्हातारा असेल किंवा रोगी असेल तर त्याच्या जखमा चिघळून त्या प्राण्याचे बरे-वाईट होऊ शकते. यासाठी त्या मुलांबरोबर असणाऱ्या मोठय़ा लोकांचे अथवा इतर लोकांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी अशा मुलांना असे चुकीचे वर्तन करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. प्राण्यांना काडीने डिवचणे किंवा काठीने ढोसणे हेही करू नये.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी , मुंबई २२ office@mavipamumbai.org
सफर काल-पर्वाची : पारशांचे उगमस्थान
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
इतिहासात आज दिनांक.. : २६ डिसेंबर
१८९३ चीनमधील नवलोकशाही कम्युनिस्ट क्रांतीचे प्रणेते माओ त्से-तुंग (झेडाँग) यांचा जन्म.
१९१४ समाजभूषण बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे) यांचा जन्म. हिंगणघाट (जि. वर्धा) येथील जमीनदार कुटुंबात जन्मलेले बाबा बालपणापासूनच निर्भीड व बंडखोर. मानवतावाद आणि सामाजिक कार्याची बीजे त्यांच्या बालपणातच रुजली. बी.ए., एल.एल.बी.चं शिक्षण झाल्यावर त्यांनी दुर्ग-मध्य प्रदेश येथे वकिली करण्यास सुरुवात केली. भारत छोडो आंदोलन काळात महात्मा गांधी व विनोबांचा प्रभाव आणि सहवास मिळाला. यातूनच त्यांनी देशासाठी तुरुंगवास भोगला. ब्रिटिश सैनिकाच्या तावडीतून एका महिलेचे संरक्षण केले म्हणून महात्मा गांधी यांनी त्यांचे वर्णन अभयसाधक असे केले. आमटे यांच्याबद्दल सुचित्रा घोगरे-काटकर लिहितात- ‘कुष्ठरोग्यांना त्यांच्या घरातूनही हाकलले जात होते, त्या वेळी बाबा आमटे नावाचा तरुण पुढे येतो आणि कुष्ठरोग्यांची सेवा-शूश्रुषा करू लागतो. त्यांची वसाहत उभी करतो आणि त्याला ‘आनंदवन’ बनवतो. हे सारेच विलक्षण होते. कुष्ठरोग्यांवर केवळ उपचार करून बाबा थांबले नाहीत तर त्यांना स्वावलंबी बनविण्याचे आणि कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्याचे कामही त्यांनी केले.
१९१७ कवी, समीक्षक, भाषांतरकार प्रभाकर बळवंत माचवे यांचा जन्म. ‘हिंदी व मराठी के निर्गुण काव्य का तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर त्यांना पीएच.डी. मिळाली होती.
डॉ. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in