अर्गो ही एक आंतरराष्ट्रीय प्रणाली आहे, जी जगभरातील सागर, उपसागर व महासागरांतर्गतची माहिती पाण्यावरील तरंगकांमार्फत मिळवते. तरंगक (फ्लोट्स) हे सागराच्या प्रवाहाबरोबर पाण्याचा पृष्ठभाग आणि मध्यम पातळीदरम्यान खालीवर होत असतात. ते समुद्राच्या पाण्याचे तापमान, क्षारता, प्रवाह आणि जैवप्रकाशकीय गुणधर्म मोजत असतात. अर्गोटो नावाच्या ग्रीक पौराणिक नौकेच्या नावावरून अर्गो हे नाव या प्रणालीला दिले गेले. अर्गो ही प्रणाली प्रथम अमेरिकेतील मेरिलँड इथे १९९९ साली ओशनऑब्ज (ओशन ऑब्झर्विग सिस्टीम) या परिषदेमध्ये सादर केली होती. ही परिषद आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समुद्र निरीक्षणांच्या कार्यक्रमांमध्ये समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी भरली होती. प्रसिद्ध अमेरिकन भौतिकसमुद्रशास्त्रज्ञ डीन रोम्मिक यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या एका गटाने अर्गोचे माहितीपत्रक प्रथम तयार केले होते. या सभेत अर्गो प्रणालीमार्फत केल्या जाणाऱ्या निरीक्षणांच्या आकडेवारीची जागतिक स्तरावर देवाणघेवाण होण्यासाठीच्या यंत्रणेवर निर्णय घेण्यात आले. या परिषदेत ठरलेल्या उद्दिष्टाप्रमाणे या अर्गो प्रणालीमध्ये नोव्हेंबर २००७ पर्यंत तीन हजार जागतिक तरंगकांची मालिका पूर्ण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरंगक पाण्याच्या हजार मीटर खोलीपर्यंतची मोजमापे घेतात. दर दहा दिवसांनी ते त्यांची तरंगण्याची शक्ती बदलते आणि ते दोन हजार मीटर खोलीपर्यंत जाऊन पाण्याच्या उष्णतेची वाहकता, तापमान आणि दाब यांची नोंदणी करून परत पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. या नोंदींवरून समुद्राच्या पाण्याची क्षारता व घनताही मोजता येते. तरंगक वर्षांला तापमानाच्या व क्षारतेच्या एक लाख नोंदी पुरवतात. अर्गोच्या एका मालिकेमध्ये चार हजार तरंगक असतात. एका तरंगकाचे वजन २० ते ३० किलो असते. हे तरंगक जागतिक महासागर निरीक्षण प्रणालीचा महत्त्वाचा घटक आहेत. हे तरंगक २००० सालापासून कार्यरत आहेत. आतापर्यंत चार उपग्रहांसह प्रमाणभूत अर्गो तरंगक दर दहा दिवसांच्या कार्यकालचक्राने कार्यान्वित आहेत. अर्गोचा डेटा हवामानशास्त्र व समुद्रशास्त्र यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी उपयुक्त असतो. हवेच्या तसेच समुद्रांच्या पूर्वानुमानासाठी लागणाऱ्या महासागर व वातावरण यांचे संयुक्त प्रारूप (कपल्ड ओशन अ‍ॅट्मोस्फेरिक मॉडेल) आणि गतिशील प्रारूप (डायनॅमिक मॉडेल) यांच्या सुरुवातीच्या अवस्थेच्या परीक्षणांसाठी उपयुक्त आहे. अर्गो प्रणाली हवामानाच्या पूर्वानुमानासाठी जागतिक स्तरावर अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
अनघा शिराळकर,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal argo system for ocean studies amy