ग्वानो शब्द ‘वानू’ म्हणजे शेण या अर्थी, इंका संस्कृतीतील ‘केचुवा-स्पॅनिश’ भाषेतून आला आहे. ग्वानो म्हणजे समुद्रपक्ष्यांचे उत्सर्ग, अंडय़ाची कवचे आणि मृत पक्ष्यांच्या सांगाडय़ांचे मिश्रण. ग्वानोचे वर्गीकरण भौगोलिक परिस्थिती, अवक्षेप (सेडिमेंट) होण्याचा काळ आणि रासायनिक गुणधर्मावर बेतलेले असते. ग्वानोच्या वर्षांनुवर्षे साचलेल्या अवक्षेपाच्या अवसादनामुळे बेटे निर्माण झाली. पेरू, चिले दक्षिण-अमेरिकेच्या किनाऱ्याने ग्वानोची बेटे चार लाख ७६ हजार २८४ हेक्टर क्षेत्रात पसरलेली आहेत. मानवाने संपूर्णपणे ग्वानोपासून बनवलेला व्होल्व्हीस बे भूखंड नामिबिया देशात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्रपक्षी त्यांचा उत्सर्ग ग्वानोरूपात टाकतात, म्हणून ही बेटे समुद्राजवळ असतात. विशेषत: समुद्रातील पाणकावळा, सी-गल्स, पेंग्विन पक्षी भूचर प्राण्यांप्रमाणे युरियाच्या स्वरूपात उत्सर्ग करत नाहीत. विविध प्रकारच्या प्राण्यांत त्यांच्या अधिवासात असणाऱ्या पाण्याच्या मुबलकतेनुसार नत्रयुक्त उत्सर्ग (अमोनिया, युरिया, युरिक आम्ल, ग्वानो) शरीराबाहेर टाकण्यासाठी निरनिराळय़ा पद्धती निवडल्या जातात.

हेही वाचा >>> कुतूहल: कॉन-टिकी तराफ्यावरून सागरी प्रवास

पक्षी, वटवाघळे असे प्राणी उडायचे असल्याने पाणी कमी पितात. कोळी, विंचवासारखे पाणी उपलब्ध नसणारे प्राणी, पाणी वाचवण्याच्या आत्यंतिक गरजेमुळे उत्सर्ग ग्वानोरूपाने दाट पेस्ट-पावडर रूपात शरीराबाहेर टाकतात. दूरदेशी स्थलांतर करणारे पक्षी, वटवाघळे मार्गातील बेटांवर विश्रांतीसाठी बसतात. त्यांच्या मूत्र-विष्ठेचा संग्रहरूपी ग्वानोचे डोंगरच बेटांवर साठतात. पूर्वापार नैसर्गिक खत म्हणून ग्वानोचा वापर केला जाई. कारण ते नत्र, स्फुरद आणि पोटॅशियमने समृद्ध असते. थोडय़ाफार प्रमाणात बंदुकीची दारू म्हणूनही ग्वानो वापरत. १८०२ ते १८०४ या कालावधीला ‘ग्वानो युग’ म्हटले जाई. मात्र अति प्रमाणातील ग्वानो उत्खननामुळे समुद्रपक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले. 

हेही वाचा >>> कुतूहल: समुद्र अभ्यासासाठी ‘अर्गो प्रणाली’

अमेरिकेने तर १८५६ मध्ये ‘ग्वानो आयलंड कायदा’ करून त्यानुसार जगभरात कोठेही ग्वानो अवक्षेप सापडत असतील आणि अशा बेटावर मनुष्यवस्ती नसेल तर त्या बेटाची मालकी अमेरिकेकडे जाईल, असे घोषित करून टाकले होते. अमेरिकी सैन्य अशा ग्वानो बेटांची जपणूक करत असे. प्राचीन इंका संस्कृतीतील राजे, पेरू देशाच्या आसपासच्या ग्वानोच्छादित बेटांवरील ग्वानो जनतेला खत म्हणून वाटत. ग्वानोचे शेतीउत्पादन वाढवण्यातले महत्त्व जाणून समुद्री पक्ष्यांना त्रास देणाऱ्यांना, विणीच्या हंगामात ग्वानो बेटांवर जाणाऱ्यांना मृत्युदंडही देत. रासायनिक खतनिर्मिती सुरू होण्यापूर्वी गेली २०० वर्षे ग्वानो बेटांवर दक्षिण अमेरिकन देशांची निसर्गसंपत्ती, आफ्रो-आशियाई मजुरांचे श्रम वापरून अमेरिका, युरोप समृद्ध झाले.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal guano islands excrement of seabirds conserving guano islands zws