सन १८८८ मध्ये ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ फ्रिडरिश राइनिट्झेर गाजरात आढळणाऱ्या ‘कोलेस्टेरिल बेंझोएट’ या द्रव्यावर संशोधन करत होता. तापवल्यानंतर, १४५ अंश सेल्सियस तापमानाला हे द्रव्य वितळून त्याचे रूपांतर गढूळ द्रवात होते. त्यानंतर आणखी तापवल्यावर मात्र या द्रवाचा गढूळपणा नाहीसा होत होता. राइनिट्झेर याने हे कळवल्यावर, ऑट्टो लेहमान या संशोधकाने या पदार्थाचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. त्याला या गढूळ द्रवात लांबट आकाराचे स्फटिक आढळले. लेहमानने या वैशिष्टय़पूर्ण द्रवाला ‘द्रव स्फटिक’ (लिक्विड क्रिस्टल) म्हणून संबोधले.
प्रकाशलहरींची आंदोलने ही विविध प्रतलांत होत असतात. मात्र ही आंदोलने एकाच प्रतलापुरती मर्यादित केली, तर त्या प्रकाशाला ध्रुवित (पोलोराइझ्ड) प्रकाश म्हटले जाते. द्रव स्फटिकांचे वैशिष्टय़ हे आहे की, या द्रवातून प्रकाश पाठवला तर तो ध्रुवित होऊन बाहेर येतो. तसेच अगोदरच ध्रुवित असलेला प्रकाश जर या द्रव स्फटिकांतून पाठवला, तर स्फटिकांच्या दिशेनुसार ध्रुवित प्रकाश पार होण्याचे प्रमाण बदलते. अनुकूल परिस्थितीत सगळा प्रकाश द्रव स्फटिकांतून पार होतो, तर प्रतिकूल परिस्थितीत सर्व प्रकाश अडवला जातो. अन्यथा प्रकाश पार होण्याचे प्रमाण स्फटिकांच्या दिशेनुसार या दोहोंच्या मधे असते.
अमेरिकेतील आरसीए लॅबोरेटोरीतला संशोधक रिचर्ड विल्यम्स याला १९६० च्या दशकात केलेल्या संशोधनात, द्रव स्फटिकांची दिशा ही त्यावर दिलेल्या विद्युतक्षेत्राच्या तीव्रतेनुसार बदलत असल्याचे आढळले. या शोधामुळे विद्युतक्षेत्राची तीव्रता कमी-अधिक करून द्रव स्फटिकांची दिशा बदलणे शक्य होणार होते. आधीच ध्रुवित असलेला प्रकाश जर या द्रव स्फटिकांतून पाठवला, तर या स्फटिकांच्या दिशेनुसार त्या प्रकाशाची तीव्रता बदलणार होती.
तात्पर्य, विद्युतक्षेत्राची तीव्रता कमी-अधिक करून प्रकाशाच्या ठिपक्यांची तीव्रता कमी-अधिक करणे शक्य होणार होते. या क्रियेद्वारे चित्रनिर्मिती करता येणार होती. मात्र, यासाठी द्रव स्फटिकांचे तापमान उच्च ठेवावे लागत होते. विल्यम्सचा सहकारी जॉर्ज हाइलमायर याने यानंतर नेहमीच्या तापमानाला वापरता येतील अशा द्रव स्फटिकांची निर्मिती करून हा प्रश्न सोडवला. परिणामी, काही काळातच कॅलक्युलेटरवर या द्रव स्फटिकांचे पडदे दिसू लागले. कालांतराने संगणक व चित्रवाणीतील कॅथोड रे टय़ूबची जागाही द्रव स्फटिकांवर आधारलेल्या, वीज वाचवणाऱ्या आणि कमी जाडीच्या द्रव स्फटिकांच्या पडद्यांनी घेतली.