‘‘हॅलो, हे पिझा डिलाईट का?’’

 ‘‘नाही हे गूगल पिझा आहे. पिझा डिलाईटला मागच्या महिन्यात गूगलने विकत घेतलं.’’   

‘‘मला पिझा ऑर्डर करायचाय.’’

‘‘तुम्हाला नेहमीचा पिझा हवाय का?’’ 

‘‘तुम्हाला कसं माहीत? तुम्ही मला ओळखता?’’ 

‘‘आमच्याकडे ज्ञात असलेल्या माहितीवरून तुम्ही तो मांसाहारी पिझा नेहमी ऑर्डर करता.’’

‘‘होय, तोच हवाय मला.’’ 

‘‘यावेळी तुम्ही शाकाहारी पिझा ऑर्डर करा.’’ 

‘‘नकोय मला तो तुमचा बेचव पिझा.’’ 

‘‘तुमचं कोलेस्टरॉल वाढलंय म्हणून सांगतोय.’’ 

‘‘माझ्या कोलेस्टरॉलचा आणि तुमचा काय संबंध?’’ 

‘‘आमच्याकडे उपलब्ध असलेल्या तुमच्या माहितीवरून गेल्या सात वर्षांच्या चाचण्या हे दर्शवतात, की आपलं कोलेस्टरॉल अधिक असतं.’’

  ‘‘असू दे. तुझा तो सडका शाकाहारी पिझा मला नको. मी औषधं घेतो.’’

‘‘माफ करा महोदय, परंतु तुम्ही औषधं नियमितपणे घेत नाही. उपलब्ध माहितीवरून असं दिसतं की ३० गोळय़ांची एक डबी तुम्ही विकत घेतली होती, त्या ‘क्ष’ दुकानातून चार महिन्यांपूर्वी.’’

‘‘मी दुसऱ्या दुकानातून घेतल्या होत्या.’’

 ‘‘पण तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तसं दाखवत नाही.’’

 ‘‘मी रोख पैसे देऊन घेतल्या होत्या.’’ 

‘‘तुमच्या बँक स्टेटमेंट प्रमाणे तुम्ही एवढे पैसे बँकेतून काढलेले नाहीत.’’

‘‘माझ्याकडे पैशाचा दुसरा स्रोत आहे.’’ 

‘‘गेल्या सहा वर्षांपासून तुम्ही जी प्राप्तिकराची  महिती देता त्यात कुठे उल्लेख नाही. असे नोंद नसलेले पैसे बाळगणं बेकायदा आहे.’’

‘‘कायद्याचं नको सांगू मला आणि तू कोण रे मला जाब विचारणारा?’’ 

‘‘माफ करा, हे तुमच्याच भल्यासाठी सांगतोय.’’

 ‘‘नकोय मला तुझी मदत. गूगल, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम या सगळय़ांचा मला आता कंटाळा आलाय. आता मी जिथे फोन नाही, इंटरनेट नाही, मोबाइल नाही, टीव्ही नाही, केबल नाही अशा निर्जन बेटावर जाणार. म्हणजे कोणीही माझ्यावर पाळत ठेवणार नाही.’’

‘‘अवश्य जा, पण आधी तुमच्या पारपत्राचं म्हणजे पासपोर्टचं नूतनीकरण करून घ्या, कारण सहा आठवडय़ांपूर्वीच ते कालबाह्य झालं आहे.’’

हा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा अस्सल आणि इरसाल नमुना. म्हणजे माणसाने काय खावं, काय करावं हेही आता कृत्रिम बुद्धिमत्ताच ठरवणार.

 डॉ. किशोर कुलकर्णी  ,मराठी विज्ञान परिषद