प्रतिजैविके, नैसर्गिक कार्बनी संयुगे असतात. जीवाणू आणि कवके त्यांच्या चयापचय क्रियेद्वारे निर्माण झालेले ते उत्सर्जित पदार्थ असतात. ती निर्माण करून सूक्ष्मजीव अन्य प्रकारच्या सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. मातीमध्ये जगण्यासाठीचा हा संघर्ष सतत सुरू असतो. जगण्यासाठीचे घटक सजीवांना संघर्षाविना मिळत नाहीत. काही सूक्ष्मजीव प्रतिजैविके निर्मितात, स्वत:बाहेर टाकून प्रतिस्पर्धी मारतात. प्रतिस्पर्ध्यांची संख्या घटल्यावर प्रतिजैविके बनवणाऱ्यांना स्वत:साठी जास्त संसाधने मिळतात. रोगकारक सूक्ष्मजीव मारणारी प्रतिजैविके, रोगनियंत्रणास उपयोगी पडतील हे माणसांना समजले. त्यातून प्रतिजैविके निर्मितीचा मोठा उद्योग उभा राहिला.
अलेक्झांडर फ्लेमिंगना पेनिसिलीन, या प्रतिजैविकाचा शोध १९२८ मध्ये लागला. पेनिसिलीनच्या चाचण्या झाल्या. आधी प्रयोगशाळेत कमी प्रमाणात पेनिसिलीन बनवले गेले. नंतर कारखान्यांत मोठ्या प्रमाणात जगभरातील माणसांसाठी रोगोपचार म्हणून बनवले गेले. रुग्णांवरील उपचारांसाठी पेनिसिलीनच्या गोळ्या, इंजेक्शने उपलब्ध होण्यास १९४५ साल उजाडले. दुसऱ्या महायुद्धकाळात हजारो जखमी सैनिक पेनिसिलीनमुळे वाचले. तेव्हा जंतुसंक्रमित रुग्णांचा जीवही प्रतिजैविके वाचवतात हे कळले. पेनिसिलीन हे ‘अरुंद-स्पेक्ट्रम’ प्रतिजैविक आहे. म्हणजे ते फक्त ग्राम पॉझिटिव्ह रोगकारक जंतूंचा नायनाट करू शकते. उदा. स्टेफिलोकोकल संसर्ग.
डॉक्टर सेलमान वॉक्समन यांनी स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकाचा शोध लावला. हा क्षय रोगावरचा पहिला प्रभावी उपचार ठरला. हे ‘व्यापक-स्पेक्ट्रम’ प्रतिजैविक आहे. १९५२ साली त्यांना या शोधाबद्दल नोबेल परितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढील ३०-३५ वर्षांत टेट्रासायक्लीन, अझीथ्रोमायसीन, अमॉक्सिसिलीन, पॉलीमिक्झीन, बॅसिट्रॅसीन, क्लोरॅम्फेनिकॉल, रायफॅम्पीन, निओस्पोरीन अशा प्रतिजैविकांची निर्मिती, अभ्यास, वापर सुरू झाला. प्रतिजैविके विविधप्रकारे प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करतात. पेनिसिलीन जीवाणूच्या पेशीभित्तिका नष्ट करते, सिफॅलोस्पोरीन, अझीथ्रोमायसीन, क्विनोलोन ही प्रतिजैविके सूक्ष्मजीवांच्या डीएनए, आरएनए आणि प्रथिन निर्मितीत अडथळे आणतात. प्रतिजैविकांबाबत महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाला दिलेली औषधाची मात्रा रुग्णाने सूचित प्रमाणात व पूर्ण कलावधीसाठी घ्यावी. स्वत:हून औषध घेणे बंद करू नये किंवा एखाद्या संसर्गदोषासाठी स्वत:हून कुठलेच प्रतिजैविक घेऊ नये.
कालांतराने प्रतिजैविकांना रोगकारक जंतूंचा विरोध वाढतच जातो आणि याचा परिणाम असा होतो की, रोगजंतूदेखील उत्परिवर्तित होतात आणि प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात. क्षयाचा (टीबी) जीवाणू अनेकदा उत्परिवर्तित झाल्यामुळे या प्रतिजैविकांना न जुमानणारे एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी सारखे रौद्रावतार अस्तित्वात आले आहेत. या उत्परिवर्तित प्रजाती एकाचवेळी अनेक प्रतिजैविकांना विरोध करतात. मूत्राशयात जंतुसंसर्गदोष निर्माण करणारे जीवाणू नेमके कुठल्या प्रतिजैविकांना प्रतिसाद देतील याची चाचणी करूनच योग्य प्रतिजैविकाची निवड केली जाते.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org