सध्या मानवी श्रम आणि बुद्धी वापरून केली जाणारी बहुतेक कामे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली करू शकतील असे चित्र पुढे येत आहे. तसे झाल्यास, ग्रंथपाल आणि ग्रंथालयातील इतर कर्मचारी आपला वेळ आणि ऊर्जा प्रगत संशोधनाला साहाय्य आणि नव्या सेवांची रूपरेखा आखण्यासाठी वापरू शकतात. विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील ग्रंथालय हे ‘विदा केंद्रा’चे (डेटा सेंटर) रूप घेऊ शकते आणि दूरवरच्या वापरकर्त्यांनाही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आभासी मदतनीसाच्या (व्हर्चुअल असिस्टंट) रूपात २४ तास या प्रकारे सेवा पुरवू शकते.

कुठल्याही भाषेत बोलून दिलेल्या सूचना किंवा विचारलेले प्रश्न समजून ग्रंथालयातील साहित्य आणि इतर स्रोतांतून उत्तरे काढून देणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाल्या (व्हॉइस असिस्टंटस्) ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्रभावीपणे सेवा देत आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता – वास्तवदर्शी अनुभव

ग्रंथालय, विशेषत: सार्वजनिक ग्रंथालय हे परिपूर्ण ‘ज्ञान केंद्र’ या स्वरूपात रूपांतरित केले जावे हे स्वप्न असून ते साकारण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता कळीची भूमिका बजावणार आहे. याला कारण म्हणजे ज्ञान अनेक ठिकाणांहून मिळते आणि अनेकदा यादृच्छिक, गोंधळात टाकणारे, चुकीचे, अर्धवट, दोषपूर्ण, जुने, बाद झालेले, अनिश्चित, छेद देणारे आणि विखुरलेले असू शकते. तरी ज्ञानाचा विश्वासाने वापर करण्यासाठी ते तपासून त्याचे शुद्धीकरण करून अनुक्रमे ते प्रमाणित, स्पष्ट, अचूक, परिपूर्ण, दोषरहित, अद्ययावत, मान्य असलेले, निश्चित, सुसंगत आणि सुबक करणे हे नितांत गरजेचे होते. ग्रंथालयाला ही जबाबदारी भविष्यात मोठ्या प्रमाणावर पार पाडून आपले महत्त्व अबाधित राखावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतल्याशिवाय हे शक्य होणार नाही. तरी ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अंकीय आणि संगणक साक्षरतेच्या पुढे जाऊन, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता’ मिळवणे आणि त्यात पारंगत होण्यास गत्यंतर नसेल याची नोंद घ्यावी. या दृष्टीने ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या पाठ्यक्रमात या नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला जावा. तसेच या संबंधीच्या कार्यशाळा आयोजित करून सेवेत असलेल्या ग्रंथपाल व त्यांच्या साहाय्यकांना तांत्रिक प्रशिक्षण वेळोवेळी मिळेल असे या क्षेत्रातील संस्थांनी बघावे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यावर आधारित साधने यांना शत्रू मानू नये. त्यांचा अधिकाधिक उपयोग ग्रंथालयाच्या विविध कार्यांत आणि सेवा विस्तारण्यात कसा करता येईल यावर विचारमंथन केल्यास, ग्रंथालये आपली उपयुक्तता परत सिद्ध करू शकतात.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ई-मेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org