अवकाशात जसे असंख्य ग्रह-तारे आहेत, तसेच लक्षावधी लहानसहान खडकही आहेत. त्यांना आपण अशनी (अॅस्टेरॉइड) म्हणतो. काही वेळा अशनी आपल्या कक्षा सोडून सूर्याच्या भेटीस येतात. जर त्यांच्या मार्गात पृथ्वी आली, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अशनी सूर्याऐवजी पृथ्वीलाच भेट देतात. जेव्हा अशनी पृथ्वीच्या वातावरणात वेगाने शिरतात, तेव्हा हवेशी त्यांचे घर्षण होते आणि त्यांचे तापमान प्रचंड वाढते. लहानसहान अशनी तर वातावरणातच जळून खाक होतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतसुद्धा नाहीत. पण कधी कधी अशनींचा आकार इतका मोठा असतो, की हवेमध्ये नष्ट न होता त्यांचा उरलासुरला अतितप्त भाग प्रचंड वेगाने पृथ्वीवर आदळतो. पृथ्वीवर आदळण्याचा त्यांचा वेग इतका असतो, की पृथ्वीच्या पृष्ठभागावर विवर तयार होते. अशा विवरांना ‘आघात विवर’ (इम्पॅक्ट क्रेटर) म्हणतात. पृथ्वीला एवढ्याशा धक्क्याने काही होत नाही, पण अशनी पृथ्वीवर पडताना त्याच्या ज्वलनामुळे हवेमधील ऑक्सिजन कमी होऊन हवेमध्ये इतर विषारी घटक निर्माण होतात. आघाताच्या धक्क्यामुळे शक्तिशाली भूकंपलहरी निर्माण होतात. त्यामुळे सजीव सृष्टीसाठी हे अशनीपात धोकादायक असतात.
सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एका प्रचंड मोठ्या अशनीने पृथ्वीवर आघात केला. या आघातात एवढा जोर होता, की यामुळे त्सुनामी लाटांची उत्पत्ती झाली. या अशनीचे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचे लक्षावधी अतितप्त तुकडे अंतराळात उडून पुन्हा पृथ्वीवर पडले. यामुळे अनेक ठिकाणी वणवे लागले. याशिवाय आघाताच्या धक्क्यामुळे जगभर भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक सुरू झाले. परिणाम म्हणून पृथ्वीवरील सुमारे ७५ टक्के सजीव नष्ट झाले. १९०८ साली सायबेरियामध्ये पडलेल्या अशनीने सुमारे ८ कोटी झाडे भस्मसात केली. २०१३ साली रशियामध्ये झालेल्या अशनीपातात सुमारे १,५०० लोक जखमी झाले.
पृथ्वीवर अशनीपातामुळे अनेक विवरे निर्माण झाली आहेत. कालांतराने त्यांत पाणी जमा होऊन त्यांची सरोवरे बनतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे अशा प्रकारच्या सरोवराचे उत्तम उदाहरण आहे. हे सरोवर सुमारे ३५ ते ५० हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले आहे. याचा व्यास सुमारे १.८ किलोमीटर असून ते सुमारे १५० मीटर खोल आहे. याचा काठ सुमारे २० मीटर उंचावला आहे. यावरूनच या आघाताच्या तीव्रतेची कल्पना येते. अशनींपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी जगभरातील अवकाशसंस्था कार्यरत आहेत. पण हे अशनी शोधण्याचे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेतच आहे. इतके, की काही मोठे अशनी पृथ्वीच्या अगदी जवळून गेले पण अशनी पृथ्वीच्या पुढे गेल्यावरच आपल्याला त्याचा पत्ता लागला.
– डॉ. निनाद भागवत
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org