कधीकाळी असाही समज होता की, जंगलातील सडलेल्या लाकडापासून मगर तयार होते! आणि मधमाशा या फुलापासून निर्माण होतात! मानवाला त्यावेळी जेवढे विश्व दिसले, त्याने जे अनुभवले तेवढाच त्याच्या विचारांचा परीघ होता. त्या वेळी मानवाने पृथ्वीवरची झाडे आणि प्राणी मोजण्याचादेखील केविलवाणा प्रयत्न केला होता, कारण त्याचे विश्वच तेवढे होते.

डॉक्टर फ्रान्सिस्को रेडी (फेब्रुवारी १८,१६२६ – मार्च १, १६९७) यांनी जीवाच्या उत्पत्तीविषयी जो महत्त्वपूर्ण प्रयोग केला, त्याला आता साडेतीनशे वर्षे होऊन गेली. त्यांच्या प्रयोगात त्यांनी दोन-दोन काचेच्या बरण्यांचे तीन संच घेतले. त्या सर्वांमध्ये त्यांनी मांसाचे तुकडे ठेवले. पहिल्या संचातील बरणीचे तोंड उघडे ठेवले. दुसऱ्या संचातील बरणीचे तोंड मलमलच्या कापडाने घट्ट बांधले आणि तिसऱ्या संचातील बरण्यांचे तोंड फिरकीचे झाकण घट्ट लावून हवाबंद केले. काही दिवसांनी बरण्यांचे निरीक्षण केल्यावर त्यांना उघड्या बरण्यांमध्ये माशा आणि अळ्या दिसून आल्या. मलमलच्या कपडयाने बांधलेल्या बरणीच्या तोंडावर वरच्या बाजूला अळ्या होत्या पण त्या आत जाऊ शकल्या नाहीत आणि खायला न मिळाल्यामुळे त्या मरून गेल्या. मात्र फिरकीच्या झाकणाने बंद केलेल्या बरण्यांमध्ये अळ्या आणि माशा अजिबात दिसून आल्या नाहीत.

या प्रयोगाचा निष्कर्ष १६६८ साली त्यांनी लिहून ठेवला तो असा, ‘मांसाच्या तुकड्यांवर माशांनी अंडी घातल्याशिवाय जीवनिर्मिती झालेली नव्हती. जरी मृत प्राण्यांच्या शरीरामध्ये आणि मृत वनस्पतींमध्ये फार मोठ्या प्रमाणात किडे निर्माण होत असले तरी, माझा असा पक्का विश्वास आहे की, त्यांची उत्पत्ती अचानक होत नसून त्यांचे प्रजोत्पादन होत असते.’

या सिद्धांताला जीवजनन असे म्हणतात. इ.स.१८७९ साली ‘बायोजेनेसिस’ हा शब्द थॉमस हेन्री हक्स्ले यांनी प्रचलित केला. अस्तित्वात असलेल्या जीवापासून जीवाची निर्मिती म्हणजे ‘जीवजनन’ (बायोजेनेसिस) आणि मृत वस्तूपासून जीवाची निर्मिती म्हणजे ‘अजीवजनन’ (एबायोजेनेसिस) या संकल्पनेवर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

रेडीच्या जीवजनन सिद्धांताला १९व्या शतकात फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी बाकदार नलिकेच्या चंबूच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगाने पुष्टी मिळाली. अशा प्रकारे लुई पाश्चरने रेडीच्या सिद्धान्ताला एकप्रकारे पाठिंबा दिला. वृक्षनिर्मितीसाठी बिया, पक्ष्याच्या निर्मितीसाठी अंडी, प्राण्याच्या निर्मितीसाठी जननपेशी हेच स्राोत असतात. कालपरत्वे जनुकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जनुक अभियांत्रिकी विकसित होऊन टेस्टट्यूब बेबी आली. क्लोनिंग तंत्र उदयाला आले. संश्लेषित (सिंथेटिक) जीवशास्त्र आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे भविष्यात ‘जीवजनन’ ही संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडावी लागल्यास नवल नाही.

डॉ. सुहास कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org