सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मदर्शकातून सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉबर्ट हूक यांनी बुचाच्या झाडातील भागाची रचना पाहून त्यात असलेल्या छोट्या कप्प्यांना सर्वप्रथम पेशी (सेल) असे नाव दिले आणि ‘सेल थिअरी’ म्हणजेच ‘पेशी सिद्धांत’ ही संकल्पना मूळ धरू लागली.

१८३८मध्ये वनस्पती शास्त्रज्ञ मथाईस जॅकब श्लेडन यांनी निरनिराळ्या वनस्पतींच्या अभ्यासातून असे सिद्ध केले की, वनस्पतीची रचना ही एक प्रकारच्या पेशींच्या समूहांच्या एकत्रीकरणाने तयार झालेली आहे. सजीवातील विविध अवयव किंवा नखे, पिसे आणि केस हेदेखील पेशीपासून तयार झालेले असतात, असे ठामपणे सांगणारा शास्त्रज्ञ म्हणजे थिओडोर श्वान. बर्लिन विद्यापीठातील चिकित्सक आणि शरीरशास्त्रज्ञ थिओडर श्वान यांनी प्राण्यांच्या चेतातंतूंच्या ऊतीचा तुकडा घेऊन प्राणीपेशींच्या संरचनेचा अभ्यास सुरू केला. त्यांना आढळून आले की, प्राण्यांमधील मूलभूत सर्वांत छोटा भाग हा पेशीपासून तयार झालेला असतो. १३ प्रकारच्या विविध पेशींची चित्रे काढून त्यांची वर्णने सादर करणारे ते पहिले शास्त्रज्ञ ठरले.

सदर अभ्यासाच्या निष्कर्षातून श्लेडन आणि श्वान यांनी मिळून ऊतीसिद्धांत मांडला. जगातील सर्व शास्त्रज्ञांनी हा पेशीसिद्धांत स्वीकारला. पण पेशीची उत्पत्ती पेशीपासून होते असे न म्हणता ‘प्रत्येक पेशीच्या आत आणि सभोवती एक आकारहीन असा पदार्थ असतो, त्यापासून पेशीची निर्मिती होते.’ असे चुकीचे विधान श्वान यांनी त्यांच्या पुस्तकात केले. या जीवरसायनाला त्यांनी ‘ब्लास्टमा’ असे म्हटले. कोणत्याही पुराव्याशिवाय केलेले हे विधान कोणी स्वीकारले नाही.

श्लेडन यांनी वनस्पतींच्या पेशींवर केलेल्या संशोधनातून सिद्धांत मांडला की वनस्पतींचे मूलभूत एकक पेशी आहे आणि पेशी वाढून नवीन पेशीचे उत्पादन आणि विकास होत असतो. पुढे १८५५ साली रुडॉल्फ व्हर्चोव नावाच्या शास्त्रज्ञाने पेशीची निर्मिती पेशीपासून होते, ब्लास्टमापासून नव्हे, असा शोधनिबंध प्रसिद्ध केला आणि या वादावर पडदा पडला.

पेशीसिद्धांताचा मुख्य गाभा म्हणजे सर्व सजीव हे पेशी या एककापासून बनलेले आहेत. म्हणजेच पेशी ही वनस्पती व प्राणी यांच्या पेशीसमूहाचा सर्वांत छोटा घटक आहे. प्रत्येक पेशी ही तिच्यामध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या चयापचय क्रिया घडवून आणण्यास जबाबदार असते. पेशीत एक केंद्रक असते ज्यात त्या पेशीचे जनुकीय गुणधर्म सामावलेले असतात आणि हे जैविक गुणधर्म त्याच प्रकारच्या नवीन पेशीत जसेच्या तसे सोपवले जातात. पेशीमध्ये केंद्रकासह पेशीद्रव्य (प्रोटोप्लाझम) आणि इतर काही घटक असतात; जे पेशीतील रचनात्मक आणि कार्यात्मक बाबींसाठी जबाबदार असतात. असा पेशीसिद्धांत सर्वमान्य झाला.

डॉ. रोहिणी कुळकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org