जगभरातील प्राचीन संस्कृतीच्या लोकांना (पृथ्वी सोडून) पाच ग्रहांची माहिती होती – बुध, शुक्र, मंगळ, गुरू, आणि शनी कारण हे ग्रह साध्या डोळ्यांनी बघता येतात. युरेनस आणि नेपच्युन यांचा शोध अठराव्या आणि एकोणविसाव्या शतकात दुर्बिणींच्या वापरातून लागला. आज मोठमोठ्या वेधशाळा आणि अंतराळदुर्बिणी आकाशगंगेतील इतर ताऱ्यांजवळच्या ग्रहांचा शोध लावत आहेत आणि त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते आहे.
आकाशगंगेत १०० अब्जांहून अधिक तारे आहेत आणि बाह्यग्रहांची संख्या ४० अब्जांहून अधिक असण्याची शक्यता आहे. यातील अनेक तारे शेकडो प्रकाशवर्षे दूर असल्यामुळे त्यांच्याजवळच्या परग्रहांचा शोध लावणे सोपे नाही. परग्रहांचा शोध लावण्याची प्रचलित पद्धत म्हणजे ग्रहाचे ताऱ्यासोबत संक्रमण होत असताना ताऱ्याच्या तेजस्वितेत घडणाऱ्या बदलांची नोंद घेणे आणि हे बदल ठरावीक काळानंतर परत घडतात का ते बघणे. या पद्धतीत अनेक अडचणी येतात ज्यामुळे अंदाज चुकू शकतात. एक्झोमायनर नावाचे यंत्रशिक्षण प्रारूप (मशीन लर्निंग मॉडेल) परग्रहांचा शोध लावण्यात यशस्वी ठरते आहे.
© The Indian Express (P) Ltd